आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाम फोडून ९ लाखांचे सिगारेट लंपास, चोरीनंतर चोरट्याचे डान्स करून सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - शहरातील जालना रस्त्यावर असलेले एका व्यापाऱ्याचे गोदाम फोडून तब्बल ९ लाखांचे िसगारेटचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. चोरट्याने तोंडावर मास्क, हातात हातमोजे घातले होते तर चोरी यशस्वी झाल्यानंतर चक्क नाचून त्याने आनंदही व्यक्त केला. त्याचा हा सगळा कारनामा गोदामातल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 


सिगारेट व बिस्किटांचे होलसेल व्यापारी असलेल्या महावारी बेदमुथ्था यांचे शहरातील जालना रस्त्यावर गोदाम आहे.  या गोदामात त्यांनी सिगारेटचे  बॉक्स व इतरही किमती माल ठेवलेला होता. बुधवारी रात्री काम आटोपून कर्मचाऱ्यांनी गोदाम बंद केले. गुरुवारी पहाटे साडेचार ते पावणे पाच वाजेच्या दरम्यान गोदामाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून चोरट्यांनी कुलूप तोडून गोदामात प्रवेश केला. चोरांनी ९ लाख किंमतीचे सिगारेटचे बॉक्स लांबवले. सकाळी गोदाम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. बेदमुथ्था यांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली.  उपअधीक्षक भास्कर सावंत,  गुन्हे शाखेचे निरीक्षक  घनश्याम पाळवदे, शिवाजीनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक अकलम शेख, फौजदार मीना तुपे, गंगाधर दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली.  श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, हे दोन्ही पर्याय अपयशी ठरले. बेदमुथ्था यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

 

परिसरातील नागरिकांना जाग येताच पळ
दरम्यान, पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्याने हे बॉक्स एक एक करून लंपास केले मात्र, दरम्यानच्या काळात पहाटेची वेळ असल्याने परिसरातील काही नागरिक जागे झाले होते. त्यांनी या चोरट्याला पाहिले देखील नागरिक जागे होत असल्याचे पाहून चोरट्याने पळ काढला.

 

डोक्यावर बॉक्स घेऊन नाचतच चोरटा गोदामाबाहेर
या गोदामातून एकूण सिगारेटचे दहा बॉक्स चोरट्यांनी पळवले. एकच चोर बॉक्स गोदामातून काढून बाहेर नेताना दिसत आहे. दहावा बॉक्स नेताना चोरी यशस्वी झाल्याचा आनंद  लपवू शकला नाही. तो डोक्यावर बॉक्स घेऊन नाचतच गोदामाबाहेर आल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. 

 

नेमके किती चोरटे? : चोरट्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावले. एक चोरटा गोदामातील सीसीटीव्हीमध्ये सिगारेटचे बॉक्स घेऊन जाताना दिसत आहे. हे बॉक्स कुठल्या वाहनातून पळवले, त्या चोरासोबत आणखी किती साथीदार होते, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, चेहऱ्यावर मास्क लावलेले असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसाठी अडचणीचे बनले आहे.  फुटेज ताब्यात घेतले असून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक अकलम शेख यांनी सांगितले.