आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक्झिटमुळे 32 वर्षांचा विक्रम मोडीत, हुजूर पक्षाचे जॉन्सन पास, मजूर पक्ष नापास!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्ताधारी हुजूर पक्षाला 364, विरोधी मजूर पक्षाला 203 जागी विजय मिळाला
  • मजूर पक्षाचा 17 वर्षांतील दारुण पराभव, 33 टक्के मतेही मिळाली नाहीत, हुजूर पक्षाला 43.6 टक्के मते मिळाली

​​​​​लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी सार्वत्रिक निवडणुकीत माेठा विजय संपादन करून पुन्हा आपणच १० डाऊनिंग स्ट्रीटचे किंग असल्याचे सिद्ध केले आहे. या निवडणुकीत हुजूर पक्षाला (काॅन्झर्व्हेटिव्ह पार्टी) ३६४ जागी विजय मिळाला तर मजूर पक्षाला ( लेबर पार्टी) २०३ जागी समाधान मानावे लागले. हुजूर पक्षाचा हा ३२ वर्षांतील सर्वात मोठा विजय आहे. याआधी १९८७ मध्ये मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाला ४०४ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा थॅचर सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या हाेत्या. मजूर पक्षाचा १७ वर्षातील दारुण पराभव झाला. ३३ टक्के मतेही मिळाली नाहीत, हुजूर पक्षाला ४३.६ टक्के मते मिळाली.

आधी काय : १९८७ मध्ये मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वाखाली हुजूर ४०४ जागी विजयी
आता काय : ब्रेक्झिट रद्द करू म्हणणाऱ्या मजूर पक्षासह सातही पक्षांचा पराभव झाला
पुढे काय : हुजूरचे ३१ जानेवारी २०२० पर्यंत ब्रेक्झिट मंजूर करून घेण्याचे आश्वासन

२२० महिला खासदार विजयी

यंदा एकूण २२० महिला खासदारांची निवड झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत ही संख्या १२ ने जास्त आहे. २०१७ मध्ये २०८ महिलांचा विजय झाला होता. २०५ खासदार सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. लेबर पार्टीला कामगारांचाही पाठिंबा मिळू शकला नाही. लेबर पार्टी ब्रेक्झिटवर २०१६ मध्ये आपण दिलेल्या निर्णयाचा आदर करू शकत नाही, असे त्यांना वाटते. लेबरने ब्रेक्झिट रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी बहुमत मिळवत विजय झाल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर भारत व ब्रिटन यांच्यातील भागीदारीत भविष्यात आणखी वाढ होईल, असे मोदींनी सांगितले. त्याशिवाय एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.पंतप्रधान जॉन्सन यांचे अभिनंदन करतानाच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व ब्रिटन यांच्यात लवकरचा व्यापारासंबंधी नवा मोठा करार होईल, असे स्पष्ट केले.

- ब्रेक्झिट पार्टीचे खातेही उघडले नाही. हुजूर पक्षाने लंडनच्या जागेवरही विजय संपादन केला.
- आयर्लंड मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांहून जास्त मते पडली आहेत.

भारतीयांचा दबदबा

भारतीय वंशाचे ६३ पैकी १५ पेक्षा जास्त उमेदवार विजयी
 
ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतवंशीय ६३ उमेदवार रिंगणात होते. हुजूर पक्षाकडून सर्वाधिक २५ भारतवंशीय लढत होते. मजूर पक्षाकडून १३ व ब्रेक्झिट पार्टीने १२ भारतवंशीयांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी १५ हून जास्त लोक विजयी झाले. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२ विजयी झाले होते. 

हुजूर व मजूर या दोन्ही पक्षांतील किमान डझनभर विद्यमानभारतवंशीय खासदारांनी आपली जागा कायम ठेवण्यात यश मिळवले. काही नवीन चेहरे विजयी झाले. हुजूर पक्षाकडून पहिल्यांदाच विजयी झालेल्यांमध्ये गगन मोहिंद्रा व क्लेअर कोर्टिन्हो, तर मजूर पक्षाचे नवेंद्रु मिश्रा हेही नवीन चेहरा आहेत. 

त्याशिवाय माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांनी विटहेममधून सहज विजय मिळवला. यंदा त्यांना मंत्रिमंडळात जबाबदारी मिळू शकते. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांचाही विजय झाला. माजी मंत्री आलोक शर्मा यांनीही रीडिंग वेस्ट मतदारसंघात विजय मिळवला.

भारताशी संबंध : ३७० वर भारतास खुलेपणाने दिला पाठिंबा... 
 
सत्ताधारी हुजूर पक्ष नेहमीच भारताचा पाठीराखा राहिला. अलीकडे कलम ३७० च्या मुद्यावर बोरिस सरकारने भारतास जाहीरपणे पाठिंबा दिला होता. जम्मू-काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे, अशी भूमिका घेतली होती. मजूरचे कॉर्बिन यांनी ३७० हटवल्यानंतर भारताच्या विरोधात प्रस्ताव मंजूर केला होता. आंतरराष्ट्रीय निरीक्षक नेमण्याचे मतही मांडले होते. त्याचबरोबर हिंसाचार रोखण्याचाही सल्ला दिला होता.

पुढे काय : संसदेत चर्चेनंतर ब्रिटन युरोपीय संघातून वेगळा होणार... 

सार्वत्रिक निवडणुकीमुळे युरोपीय संघाने ब्रिटनला वेगळे काढणे अर्थात ब्रेक्झिटची मुदत ३१ जानेवारी पर्यंत वाढवली होती. निकाल आल्यानंतर युरोपीय संघाचे अध्यक्ष चार्ल्स मायकल म्हणाले, आम्ही ब्रेक्झिटच्या पुढील टप्प्याच्या तयारीला लागलो आहोत. आम्हाला प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. २०१६ मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या जनमत चाचणीत ५२ टक्के लोकांनी ब्रेक्झिटचे समर्थन केले होते. ४८ टक्के लोकांनी त्यास विरोध दर्शवला होता.

ब्रेक्झिटनंतर ब्रिटन... जनमत चाचणीचे आश्वासन देणाऱ्या ७ पक्षांना २६९ जागा

- हुजूर पक्षाने ब्रेक्झिटला जाहीरनाम्यात समाविष्ट केले हाेते, ३६४ जागी विजय. मजूर पक्षासह सात पक्षांनी ब्रेक्झिटवर पुन्हा जनमत चाचणी करणे व रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना एकूण २६९ जागी विजय मिळाला.
- या सात पक्षांत लेबर, एसएनपी, लिबरल डेमॉक्रॅट्स, पीसी, एसडीएलपी, ग्रीन इत्यादीचा समावेश आहे. इतर पक्षांना १६ जागी यश मिळाले. ही ५ वर्षांतील ही तिसरी निवडणूक आहे. देशाला चौथ्यांदा पंतप्रधान मिळेल.

१० डाऊनिंगमध्ये पुनरागमन..
 
प्रचंड बहुमतानंतर बोरिस जॉन्सन लंडन येथील पंतप्रधान निवासस्थान १० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये असे दाखल झाले.

निकालानंतर लंडन येथील इमारतींवर त्याचे केलेले प्रोजेक्शन