आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदुरा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल 2.61 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा- थकीत देयकाची रक्कम वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने कंत्राटदाराच्या मित्राने केलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने दोन लाख ६१ हजार रुपयाची लाच घेताना नांदुरा पालिका मुख्याधिकारी अजितकुमार डोके यांच्यासह लेखापाल तोष्णा लोणारे या दोघांना आज रंगेहाथ पकडले. 

 

अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक ५ खैवाडी ते पंचवटी नवीन रिटनिंग वॉलचे बांधकामाचे निविदेप्रमाणे ८५ लाख ८६ हजार ८९२ रुपयांचे देयकास मंजुरी मिळाली होती. ही रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर त्याचे देयक काढून देण्यासाठी मुख्याधिकारी अजितकुमार डोके हे तीन टक्के प्रमाणे दोन लाख ५५ हजार रुपये व सहायक पर्यवेक्षक तोष्णा शामराव लोणारे यांना एक टक्के प्रमाणे ८५ हजार रुपये असे दोघांचे मिळून तीन लाख ४० हजार रुपये लाचेची मागणी संबधित कंत्राटदाराकडे करत होते. या प्रकरणी कंत्राटदार यांचे मित्राने ३ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. 

त्यानुसार लाचलुचपत खात्याने रचलेल्या जाळ्यात आज ४ जानेवारी रोजी तडजोडी अंती मुख्याधिकारी यांनी एक लाख ८६ हजारात तर तोषणा लोणारे यांचा ७५ हजार रुपये देण्याचे ठरले. यावेळी पैसे घेताना नांदुरा मुख्याधिकारी अजितकुमार डोके, लेखापाल तोषणा लोणारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
 
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना जाधव, पोलीस कर्मचारी शाम भांगे, संजय शेळके, विलास साखरे, निलेश सोळंके, विनोद लोखंडे, विजय मेहेत्रे, जगदीश पवार, शेख अर्शिद, मधुकर रगड यांनी सहभाग घेतला होता.