आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदूर रेल्वेत तडीपाराचा गळा चिरून खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती /चांदूर रेल्वे  - चांदूर रेल्वे येथील एका तीस वर्षीय युवकावर गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच त्याला जिल्ह्यातून तडीपार केले होते. दरम्यान शुक्रवारी (दि. ११) तो तारखेवर हजर राहण्यासाठी चांदूरमध्ये आला होता. दरम्यान रात्री त्याला चांदूरातील त्याच्या काही परिचितांनी जेवणासाठी बोलावले होते, याचवेळी सहा जणांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा गळा चिरून खून केला. वर्चस्वाच्या लढाईतून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. खून करणाऱ्या सहाही आरोपींना पोलिसांनी शनिवारी (दि. १२) सकाळपर्यंत अटक केली आहे. 


मो. अनिस नूर ऊर्फ टिंग्या (३०, रा. चांदूर रेल्वे) असे मृतकाचे नाव आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी नईम खान रहेमान खान (३०, रा. राजीव गांधीनगर, चांदूर रेल्वे), सतीश अनंतराव कावरे (३६, रा. डांगरीपुरा, चांदूर रेल्वे), राहुल मधूकर सहारे (२८, रा. अंजनसिंगी), चेतन बाबाराव चित्रीव (२१, रा. आर्णीरोड उमरधरा, ह. मु. चांदूर रेल्वे), गोलू ऊर्फ जाकीर पठाण (३२, रा. मिलींदनगर, चांदूर रेल्वे) आणि राहुल बच्चन कन्नासिया (२६, चांदूर रेल्वे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मो. अनिस ऊर्फ टिंग्या याच्याविरुद्ध चांदूर रेल्वे पोलिसात विविध गुन्हे दाखल होते, त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच त्याला चांदूर रेल्वेसह अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. सध्या त्याचे वास्तव्य वर्धा जिल्ह्यात असल्याचे पोलिसांंनी सांगितले. 

 

दरम्यान, शुक्रवारी टिंग्या तारखेवर हजर राहण्यासाठी चांदूरमध्ये आला होता. टिंग्या आणि नईम खान यांच्यामध्ये यापूर्वीच अनेकदा खटके उडाले आहे. नईम खानसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर 'एमपीडीए' अतंर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया चांदूर रेल्वे पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, टिंग्या वरचढ होत असल्याच्या भावनेतून नईमव सतीश कावरेच त्याचा गेम करण्यासाठी शुक्रवारी रात्री चांदूर रेल्वे येथील चमकुरा धाब्यावर टिंग्याला जेवण करण्यासाठी बोलवायचा बेत आखला. नईमच्या सांगण्यावरूनच गोलू ऊर्फ जाकीर आणि राहूल कन्नासिया या दोघांनी टिंग्याला जेवणासाठी बोलवले. दरम्यान, टिंग्या चमकुरावर पोहोचल्यानंतर दुचाकीने नईम खान, सतीश कावरे, राहुल सहारे आणि चेतन चित्रीव हे चौघे त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर सहा जणांनी टिंग्यावर चाकू, कुऱ्हाड व लाठ्या काठ्यांनी जीवघेणा हल्ला चढवला. यावेळी टिंग्याचा गळासुद्धा चिरला होता. या हल्ल्यात टिंग्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, चांदूर रेल्वे पोलिसांनी रात्रभर आरोपींचे 'सर्च ऑपरेशन' राबवून शनिवारी सकाळपर्यंत सहा जणांनाही अटक केली आहे, अशी माहिती चांदूर रेल्वे पोलिसांनी दिली. 


सहाही आरोपींना तत्काळ अटक 
मृतक टिंग्याला दोन महिन्यांपूर्वीच तडीपार केले होते, शुक्रवारी तो तारखेवर हजर राहण्यासाठी वर्धेतून चांदूरमध्ये आला होता. दरम्यान, नईम खान, त्याचे सहकारी आणि टिंग्या यांच्यात यापूर्वीही अनेकदा खटके उडाले आहेत. जुन्या वादातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. खून झाल्यानंतर आम्ही तातडीने सहाही आरोपींना अटक केली आहे. ब्रम्हानंद शेळके, ठाणेदार, चांदूर रेल्वे. 
 

बातम्या आणखी आहेत...