आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधाला कंटाळून ब्रिगेडीयर सावंत यांचा 'आप’ला रामराम, योगेंद्र यादव यांच्यानंतर दुसरे बंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक अडसूळ | मुंबई राज्यातील आम आदमी पक्षात (आप) यादवी निर्माण झाली आहे. पक्षात दीड वर्षापूर्वी प्रवेश केलेल्या व राज्य अध्यक्ष असलेल्या ब्रिगेडीयर सुधीर सावंत (मुंबई) यांना पक्षातील जुन्या नेतेमंडळींचा विरोध होता. या विरोधाला कंटाळून ब्रिगेडीयर सावंत यांनी राजीनामा दिला आहे. २०१८ मध्ये आपमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी व बहुजनवादी राजकारण पुढे नेण्यासाठी शिवराज्य पक्षाचे संस्थापक ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हाती केजरीवाल यांनी राज्याची सूत्रे सोपवली होती. मात्र, सावंत यांना मुंबईतील प्रीती मेनन गटाचा कायम विरोध राहिला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे प्रभारी दिल्लीच्या दुर्गेश पाठक यांना पाठवले होते. त्यामुळे शहरी की, बहुजनवादी राजकारण असे व्दैत आपमध्ये उभे राहिले होते. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका लढवण्याची सावंत यांची इच्छा केजरीवाल यांनी फेटाळली होती.  राज्य प्रभारी पाठक यांना राज्यातून काढावे, अन्यथा मी राजीनामा देईन, असे पत्र मागच्याच आठवड्यात ब्रिगेडीयर सावंत यांनी केजरीवाल यांना पाठवले होते. मात्र, केजरीवाल यांनी पाठक यांना न काढता त्यांनाच राज्याची प्रचार समिती घोषित करण्यास सांगितले. त्यानुसार गुरुवारी आपने महाराष्ट्रात प्रचार समिती जाहीर केली. त्यामुळे ब्रिगेडीयर सावंत यांचा राजीनामा केजरीवाल यांनी स्वीकारल्यात जमा आहे, असे आप मधील सूत्रांनी सांगितले. सावंत यांना वंचित बहुजन आघाडीसोबत आगामी विधानसभेसाठी युती करायची होती. पण, आपच्या मूळ गटाचा त्याला विरोध आहे त्यामुळे हा वाद विकोपाला गेला असून आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राचुरेसह प्रीती मेनन यांचाही समावेश
आम आदमी पक्षाच्या प्रचार समितीच्या संयोजकपदी मराठवाड्यातील शेतकरी नेते रंगा राचुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर या समितीमध्ये किशोर मंद्यान, धनंजय शिंदे, जगजित सिंग, प्रीती मेनन, मुकुंद कीर्दत, संदीप देसाई यांचा समावेश आहे.

योगेंद्र यादव यांच्यानंतर दुसरे बंड
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी राजापूर मतदार संघातून मधू दंडवते यांचा पराभव केला होता. ते काँग्रेसचे माजी खासदार आहेत. मराठा असल्याने ग्रामीण व बहुजन मतदार आपकडे वळेल यासाठी केजरीवाल यांनी सावंत यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवली होती. पण, दीड वर्षात सावंत पक्षातून बाहेर पडल्याने आपचा प्रयोग फसला आहे. राज्यात आपला योगेंद्र यादव यांनी स्वराज्य अभियान स्थापून पहिला झटका दिला होता. राज्यातील अनेक समाजवादी कार्यकर्ते आप सोडून गेले आहेत. त्यानंतर सावंत यांच्या राजीनाम्याने आणखी एक झटका बसला आहे.