पंजाबच्या सख्ख्या भाऊ-बहिणीने / पंजाबच्या सख्ख्या भाऊ-बहिणीने केले आपसात लग्न; बनावट कागदपत्रांवर ऑस्ट्रेलियाला फरार

Jan 31,2019 11:02:00 AM IST

कॅनबेरा / चंदीगड - पंजाबमध्ये सख्खे भाऊ आणि बहिण आपसात लग्न करून पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातील मुलगा आणि मुलगी बेपत्ता होते. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी आपसात लग्न केल्याचा खुलासा झाला. या घटनेवर कुटुंबियांनाच नव्हे, तर पोलिसांना सुद्धा विश्वास बसला नाही. त्यांनी सत्य समोर आणण्यासाठी त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा हे दोघे भारतात नाही तर ऑस्ट्रेलियाच्या पासपोर्टवर पती-पत्नी म्हणून फरार झाल्याचा खुलासा झाला आहे.


अनैतिक संबंधांसाठी नव्हे, तर क्रेझ म्हणून केला विवाह
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध दैनिक 'द ऑस्ट्रेलियन'चा दाखला देत डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ते ऑस्ट्रेलियात बनावट कागदपत्रे तयार करून पसार झाले. सोबतच, त्यांनी अनैतिक संबंधांसाठी नव्हे, तर एकमेकांवर प्रेम म्हणून नाही तर आपसात प्रेम असल्याने विवाह केला नाही. तर फक्त ऑस्ट्रेलियात जाण्याची क्रेझ आणि काही तरी वेगळे अॅडव्हेंचर करण्यासाठी हा विवाह केला. पोलिस तपासात तरुणीने दाखल केलेली कागदपत्रे तिची नसून तिच्या एका चुलत बहिणीची असल्याचे कळाले आहे. तिची ती चुलत बहीण ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. अशाच खोट्या कागदपत्रांवर त्यांनी पती-पत्नीचा बनावट व्हिसा काढला आणि ऑस्ट्रेलियात पसार झाले.

ऑस्ट्रेलियाने हात वर केले...
पोलिसांनी या प्रकरणात त्यांची साथ देणाऱ्या 6 जणांना अटक केली. तर त्या दोघांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. 'द ऑस्ट्रेलियन'च्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणात ऑस्ट्रेलिया प्रशासनाकडे सुद्धा मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण, तेथून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. दैनिकाशी संवाद साधताना ऑस्ट्रेलियन प्रशासनाने सांगितले, की व्हिसासाठी येणारा प्रत्येक अर्ज आणि कागदपत्रे तपासून घेतली जातात. आवश्यकता वाटल्यास त्यांची शहनिशा सुद्धा तपासून पाहिली जाते. एखाद्या देशातूनच खरी कागदपत्रे आलेली असतील तर त्यावर ऑस्ट्रेलिया काहीच करू शकत नाही.

X