आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या महिलेसोबत घरोबा केल्यामुळे बहिणीच्या पतीस मारहाण, एकास कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बहीण व तिच्या दोन मुलांना सोडून दुसऱ्या महिलेसोबत घरोबा करणाऱ्यास पाच जणांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. देशपांडे यांनी दिले. अब्दुल ऊर्फ कल्लू खालीद जहीर खान (२४, रा. इलियास कॉलनी, हर्सूल) असे आरोपीचे नाव आहे.


शोएब खान शेर खान (२७, रा. मिसारवाडी) याने तक्रार दिली होती. शोएबचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. वर्षभरापासून तो एका विवाहित महिलेच्या संपर्कात आला. कालांतराने दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शोएबची पत्नी माहेरी निघून गेली. २५ डिसेंबर रोजी रात्री शोएब त्या महिलेसह घरात गप्पा मारत बसला होता.

तेव्हा पहिल्या पत्नीचा भाऊ जुबेर खान जहीर खान, अब्दुला खालीद जहीर खान ऊर्फ कल्लू, खालीद चाऊस, हुसेन चाऊस व एक अनोळखी असे पाच जण आले. त्यांनी शोएबला लाकडी दांडा व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर जुबेर व इतरांनी शोएबला दुचाकीवर बसवून इलियास कॉलनीत आपल्या घरी आणून दोरीने बांधून ठेवले. तसेच आरोपी जुबेर व हुसेन या दोघांनी मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितल्यास चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, शोएबच्या आईने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शोएबची सुटका करत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शोएबच्या जबाबावरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


पोलिसांनी तपास करुन आरोपी अब्दुल ऊर्फ कल्लू खालीदला अटक करुन न्यायालयात हजर केले असता विशेष सहायक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, दुचाकी जप्त करणे तसेच साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...