आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावामुळे जीव वाचला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या शेतातील एका जुन्या विहिरीजवळ मोठे वडाचे झाड आहे. बुंध्याला एक मोठी पोकळीही होती. तेथून जवळच गुरांसाठी वाडा बांधण्यात आला होता. 2007 च्या एप्रिल महिन्यात विहिरीतील गाळ काढण्याचे काम चालू होते. सुमारे 10 ते 15 मजूर काम करत होते. 7 ते 8 मजूर विहिरीच्या तळाशी गाळ भरून देत होते. मशीनच्या साहाय्याने गाळ वर काढण्यात येत होता. काठावर उभे राहून मी आणि माझा लहान भाऊ विहिरीच्या गाळ उपसण्याच्या कामावर देखरेख करत होतो. अचानक आभाळ भरून आले. अंधारूनही आले. इतक्यात विजेचा कडकडाट सुरू झाला अन् मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आम्ही सर्व जण धावतच वडाच्या झाडाखाली आडोशाला गेलो. पाऊस कोसळत असताना वाराही सुसाट सुटला होता. वा-याच्या झोतामुळे वडाच्या झाडाच्या फांद्या जोरजोराने हलत होत्या. अचानक वडाचे झाड डगमगल्यासारखे वाटले. धोका सर्वांच्या लक्षात आला. वडाच्या झाडाचा आश्रय सोडून सर्व जण जुन्या वाड्याकडे पळाले. मला काहीच कळेनासे झाल्याने तेथेच उभा होतो. काय करावे सुचेनासे झाले होते. माझा भाऊ आणि इतर मजूर ओरडत होते, ‘आबा, पळा..पळा..झाड पडत आहे.’ क्षणाचाही विलंब न करता भावाने धावतच येऊन मला झाडाजवळून खेचून बाहेर काढले.

आम्ही वाड्याजवळ पोहोचत नाहीत तोच प्रचंड मोठा आवाज झाला. वडाचे झाड मुळासकट कोसळून पडले होते. सर्व जण प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. अनेकांच्या चेह-यावर भीतीचे सावट दिसून आले. काही जणांना वाटले, मी तेथेच अडकलो तर नसेल. पण मला पाहताच सर्वांना हायसे वाटले. त्यांनी आनंदाने मला मिठ्या मारल्या. माझ्या भावामुळे मी वाचलो. ही बातमी गावभर पसरली. दुस-या दिवशी सकाळी गावकरी कोसळलेले वडाचे झाड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. सर्वांच्या तोंडात एकच वाक्य होते, ‘आबा, आई-वडिलांची पुण्याई आणि परमेश्वराचे आशीर्वाद म्हणून तुम्ही वाचलात.’