आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रदरहूड... समूहाची भावना!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळात ब्रदरहूड हा शब्दच ब्लॅक चळवळीतून आलाय. आपलं कुणी नाहीये, आपल्यावरील अन्याय- अत्याचाराबद्दल बाहेरून कुणीही मसीहा येणार नाही. त्यामुळे आपणच एकमेकांसाठी आहोत. आपल्या सर्वांनाच हातात हात घेऊन सामूहिक प्रगतीसाठी, पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढायचंय. ब्लॅक पँथरचा जाहीरनामाच असा होता. दहाकलमी कार्यक्रम, ज्याचा पूर्ण गाभा या ‘ब्रदरहूड’ संकल्पनेवर आधारलेला होता. एक वंचित शोषित समूह म्हणून एकमेकांप्रति असलेली करुणा, एकमेकांना सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची कमिटमेंट, हे सगळं त्यातून आलेलं होतं. 
 

अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मँचेस्टर युनाटेडविरुद्ध क्रिस्टल पॅलेस ह्या फुटबॉल सामन्यादरम्यान मँचेस्टरच्या पॉल पोग्बाकडून एक पेनल्टी किक मिस झाली. परिणामी पोग्बावर सोशल मीडियात ट्रोलिंग सुरू झालं. त्यात पोग्बा हा ब्लॅक, कृष्णवर्णीय. त्यामुळं ट्रोलिंग नुसतं खिल्ली उडवण्यापुरतं राहिलं नाही तर अतिशय घाणेरड्या वर्णद्वेषी कॉमेंट्सपर्यंत हे ट्रोलिंग गेलं.

फुटबॉलमध्ये वर्णद्वेष काही नवीन नाही. मोठमोठ्या दिग्गज खेळाडंूना वेळीच ते "कुठल्या स्तरातून आले आहेत', त्यांची "औकात काय' ह्याची आठवण करून दिली जाते. हे डिट्टो आपल्यासारखंच. शोषित जात समूहातील एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या क्षेत्रात प्रगतिपथावर असते, तेव्हा त्याला पदोपदी या वास्तवाचा सामना करावा लागतो. ह्यात काही नवीन नाही. दोन्हीकडे सारखीच परिस्थिती. आता फुटबॉलमधल्या वर्णद्वेषावर काय अॅक्शन होते ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तो पर्टिक्युलर क्लब एक अधिकृत प्रसिद्धिपत्रक काढते. त्यात त्याच ठरावीक शब्दांत लिहिलेला तीव्र निषेध असतो. मग सहकारी खेळाडू एखादं ट्विट करून तोच, तीव्र निषेध रिपीट(किंवा रीट्विट!!) करतात... बस्स...! झालं.... रेसिझम इज नो मोअर. वि डिड इट बॉइज!!
 
 
हा एक ठरलेला साचा आहे. प्रत्येक घटनेनंतर अगदी तंतोतंत याच पद्धतीने फॉलो केलं जातं. पण वरच्या घटनेत थोडंस वेगळंपण दिसतंय. या तथाकथित लिबरल श्वेतवर्णीय लोकांच्या सहानुभूतीला फाट्यावर मारत, मँचेस्टरच टीममधले सर्व अ-श्वेतवर्णीय खेळाडू एकत्र आले, एक कुटुंब म्हणून. आणि यालाच ब्लॅक मूव्हमेंटमधील "ब्रदरहूड' म्हणून संबोधलं गेलं. ते एकमेकांसोबत उभं राहिले. मार्क्सने आवाहन केलं,"मँचेस्टर युनायटेड एक कुटुंब आहे. पोग्बासह सगळीच मुलं या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यामुळं आमच्यापैकी एकावर हल्ला करत असला तर, हा हल्ला त्या एकट्या खेळाडूवर नसून पूर्ण कुटुंबावर आहे. त्यामुळे याद राखा.' या पॉवरफुल स्टेटमेंटनं इंटरनेटसह फुटबॉल विश्वात खळबळ माजवली होती. 
 
 
ही घटना माझ्या डोक्यात पक्की बसली. तसंही, मला कळायला लागलं तेव्हापासून इंग्रजी साहित्य, सिनेमा, तिथल्या लोकांच्या चळवळी "फॉलो' करायला लागलो आणि पाश्चिमात्य  जगातला वर्ण/वंश द्वेष, त्याविरुद्धच्या चळवळी आणि भारतातला जातीयवाद, त्याला विरोध करणारी आंबेडकरी, दलित चळवळ... या दोहोंत किती साम्य आहे हे सतत माझ्या लक्षात येतं.  एका बाजूला आंबेडकरी चळवळ आणि दुसऱ्या बाजूला ब्लॅक चळवळ यांच्यात मी नेहमी तुलना करत आलोय. आणि दरवेळी चकरावून टाकणारं साम्य मला दिसलं. मात्र दोन्ही चळवळीने आजवर काय मिळवलं हे पाहूनही मन विषण्ण झालं. 
 
 
आता ही घटना बघा... पोग्बाला एकटं न सोडता सगळी कृष्णवर्णीय पोरं फक्त त्याला कोरडी सहानुभूती देत जवळ आले नाहीत तर त्याच्यासोबत खांद्याला खांदा भिडवत उभी ठाकली. यालाच म्हणतात सॉलीडॅरिटी आणि हे आहे ब्रदरहूड... मुळात ब्रदरहूड हा शब्दचं ब्लॅक चळवळीतून आलाय. आपलं कुणी नाहीये, आपल्यावरील अन्याय अत्याचाराबद्दल बाहेरून कुणीही मसीहा येणार नाही. त्यामुळे आपणच एकमेकांसाठी आहोत. आपल्या सर्वांनाचा हातात हात घेऊन सामूहिक प्रगतीसाठी, पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढायचंय. ब्लॅक पँथरचा जाहीरनामाच असा होता. दहा कलमी कार्यक्रम, ज्याचा पूर्ण गाभा या ‘ब्रदरहूड’ संकल्पनेवर आधारलेला होता. एक वंचित शोषित समूह म्हणून एकमेकांप्रति असलेली करुणा, एकमेकांना सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची कमिटमेंट, हे सगळं त्यातून आलेलं होतं. 
 
 
याच धाग्याला धरत आणखी एका संदर्भ इथं मांडावासा वाटतोय. मागेच म्हणजे गेल्या महिन्यात, टोनी मॉरिसन यांच दुःखद निधन झालं. टोनी, या शतकातल्या महत्त्वपूर्ण लेखिकांपैकी एक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक महिला, त्यातही ब्लॅक महिला म्हणून त्यांनी त्यांच्या अनुभवविश्वातून मांडलेल्या साहित्याने एका पिढीला प्रभावित केले. एक ब्लॅक महिला साहित्य क्षेत्रातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला, प्रस्थापित व्हाइट सुप्रिमसीला आव्हान देतेय ही घटनाच मोठी विलक्षण क्रांतिकारी आहे. टोनी यांनी आपल्या साहित्यातून ब्लॅक समूहाचं जगणं ज्या तीव्रतेनं मांडलं त्यासाठीच त्यांना साहित्यातला नोबेल देऊन गौरविण्यात आलं. टोनी मॉरिसन यांच्या साहित्यामुळेही ब्लॅक कम्युनिटीत ‘समूहाची भावना’ वृद्धिंगत व्हायला मदत झाली. आज जे वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून ब्लॅक समूहातली नवीन तरुण पिढी आपले अनुभव, आपलं भावविश्व, जीवनाविषयीचं आकलन मांडत आहेत, त्यामागे टोनी यांचे खूप मोठे योगदान आहे. एक नवी पिढी त्यांनी लिहिती केली. टोनी मॉरिसनचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. त्यावरून शोषित समूहाच्या घटकांची एकमेकांप्रति असलेली बांधिलकी स्पष्टपणे अधोरेखित होते. एका ठिकाणी त्या म्हणतात की,"मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत आली आहेे की, जेव्हा तुम्हाला तुमच्या स्किलवर जॉब मिळेल, जेव्हा तुम्ही "फ्री' व्हाल त्या वेळी तुमचं खरं काम असेल की आपल्यातल्याच कुणाला तरी "फ्री' करणं. जर तुमच्याकडे पॉवर, अॅथॉरिटी असेल तर तुमचं खरं काम आहे आपल्यातल्याच कुणाला तरी सक्षम करणं... त्याचं सबलीकरण करणं.” आजच्या आंबेडकरी तरुणांपुढचे सगळ्यात मोठे आव्हान हेच आहे की, ही "समूहाची भावना' अधिक जास्त दृढ करणे. या सामूहिक प्रतिकारातूनच (कलेक्टिव्ह रेझिस्टन्स)  त्यांचे आवाज दूरवर पोहचतील... हक्काचे प्लॅटफॉर्म्स उभे राहतील... त्यातूनच नवीन शिकलेल्या पिढीला साहित्य, सिनेमापासून ते उद्योग, रोजगार, शिक्षण या क्षेत्रातल्या नवनव्या वाट धुंडाळता येतील. बाबासाहेबांनी अंतिमत: सांगितलेलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा... याचा याहून वेगळा अर्थ माझ्या मते निघत नसावा.  अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या भौतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीत याच समूह, ब्रदरहूड संकल्पनेचा मोठा हात आहे. हे सामूहिक "असर्शन' फक्त वॉशिंग्टन मधील मोर्चे किंवा लॉस एंजलिसमधल्या दगडफेकीइतकचं नव्हतं. अॅकॅडमिक्स, माध्यमं, साहित्य, संगीत, ऑस्कर्स, पॉप कल्चर या सगळ्या समाजमनावर परिणाम करणाऱ्या घटकांना नाइलाजास्तव का होईना परंतु कृष्णवर्णीयांचे रिप्रेझेंटेशन, त्यांच्या रोजच्या जगण्याच्या समस्या, त्यांच्यावरचे अन्याय यावर अखेर बोलावं लागलंच. त्यांची नोंद घ्यावीच लागली. ज्यांना बोलायचा अधिकारच नव्हता तेच कृष्णवर्णीय, "ब्लॅक लाइव्हज मॅटर' म्हणत मुठी आवळून ऑस्करच्या समारंभात आपल्या समूहावरील अन्याय अत्याचाराविरोधात बोलायला लागली. वॉर्नर ब्रोज, नेटफ्लिक्स, मार्व्हल स्टुडिओने ब्लॅक समूहाच्या जगण्यावरच्या सिरीज, चित्रपट काढले. वंशद्वेषाविरुद्ध, व्हाइट सुप्रिमसी विरोधातला त्यांचा सामूहिक लढा आज एक पॉप कल्चरचं सिम्बॉल बनलंय. मीडियात आम्हाला "स्पेस' नाही म्हणत रडत बसण्याएेवजी, त्यांनी आपलं असर्शन इतकं तीव्र केलं की "स्पेस' सोडा, न्यूयॉर्क टाइम्ससारख्या जागतिक खपाच्या मीडिया हाऊसला देखील ‘ब्लॅक हिस्ट्री मंथ’ म्हणून सबंध महिना साजरा करावा लागतोय. 
 
 
हॉलीवूडमध्ये ‘ब्लॅक रिप्रेझेंटेशन’ हा डिबेटचा विषय नाहीये, तर तो एक आवाज बनलाय तिथे. स्पाईक ली सारख्या लेखक-निर्माता-दिग्दर्शकाने ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणत हॉलीवूडमधील प्रस्थापित “व्हाईट’ मक्तेदारी अक्षरशः मोडूनतोडून काढली आहे. कित्येक नव्या दमाच्या कृष्णवर्णीय पोरांना सिनेमा इंडस्ट्रीत आणून त्यांना आपलं जगणं, आपल्या लोकांच्या कथा सांगायला भाग पाडलं. आणि सोबतच तमाम अमेरिकेला ते पाहायला भाग पाडलं. “टू पाक’सारख्या रॅपर्सनी हा संघर्ष हिपहॉपच्या माध्यमातून मांडून त्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं. आज जे काही ब्लॅक समूहाने मिळवलंय, त्यांचा संघर्ष इथवर आणलायं त्यामागचं हे सगळं सारं आहे. 
 
 
आपल्याकडे ही ब्रदरहूड, समूहाची भावना नाही अशातला भाग नाही. आपल्याकडेही   दलित पँथरसारखी ऐतिहासिक चळवळ एकेकाळी उभी राहिली होती. जयंती, महापरिनिर्वाण दिनासारख्यादिवशी लाखोंच्या जनसागरातून, निळ्या झेंड्यातून ती दिसून येते. “रिडल्स’च्या मोर्च्यासारखे कित्येक मोर्चे, आंदोलन, लढ्यात एक समूह म्हणून एकमेकांचा हात हातात घेऊन लढा दिला आहे. इथेही शाहीर वामनदादा कर्डकांपासून, ते शाहीर विलास घोगरे, शाहीर शंतनू कांबळेच्या क्रांतीकारी गायनातून ते अधोरेखित झाले होते. दलित साहित्यामधून सातत्याने ही समूहाची भावना पुढं येत राहिली. पण दुर्दैवाने, असं म्हणावं वाटतंय की ही समूहाबद्दल करुणेची भावना आज हरवत चाललीय. मागच्या दोन पिढ्यातले “रेव्होल्युुश्नरी कंटेंट’ पुढे आणून,  ‘ब्रदरहुड’ आणखी प्रखरपणे मांडायला, विद्रोहाचे आवाज आणखी तीव्रतेनं मांडायला वंचित शोषित समूह कमी पडतोय. एक शोषित समूह म्हणून आज कुठंवर आले आहेत आणि त्या मागाचा सगळा संघर्ष नव्या पिढीला सांगायला कमी पडत चालले आहेत. ही एकमेकांप्रती असलेली सामूहिक भावना हरवत चालल्यामुळंच कदाचित नवीन साहित्य, नवीन नॅरेटीव्ह्ज, नव्या संकल्पना वंचित शोषित समूह मांडू शकलेले नाहीत. आज सगळेच स्वकेंद्री, व्यक्तिकेंद्री बनून “एलिट क्लास’ कडे जाण्यासाठी धडपडत आहेत. पण ज्वलंत समस्यावर काही उपाय नाही काढू शकले. उलट समस्या अधिकच जटिल होत चालल्या आहेत. व्यवस्थेकडून पद्धतशीरपणे शोषणही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे, अन्यायअत्याचाराच्या मालिकेतही कसला खंड पडलेला नाही. नव्या पिढीला नवीन मांडणी देण्यात ही चळवळ अपयशी ठरली आहे.
 
 

वंचित शोषित समूहाला नव्या काळा सोबत नवीन संदर्भ, नव्या मांडण्या कराव्या लागतील. आजच्या आंबेडकरी चळवळीला गरज आहे फक्त साहित्य, व्यापार, अॅकॅडमीक्स, सिनेमा, आयटी, तंत्रज्ञान, क्रीडा या सगळ्याच क्षेत्रात शोषित घटकांतील तरुणांची समूहाची भावना दृढ करण्याची... पिढ्यांन् पिढ्यापासून चालत आलेल्या या सामाजिक न्याय आणि समतेच्या लढाईशी स्वतःची बांधिलकी तपासून पाहण्याची... पेटत्या वस्त्यांशी नाळ तोडून सात्विक पांढरपेशी होण्याची केविलवाणी धडपड थांबवण्याची... प्रत्येक संकटाच्या वेळी वंचित शोषित समूहासोबत ठामपणे उभं राहण्याची... विद्रोहाचे आवाज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तिव्रतेने मांडण्याची... आणि  नव्या पिढीला, नवीन डिस्कोर्स, नवीन संकल्पना, नवीन कंटेंट देण्याची. आजच्या तरुण पिढीनं हे इतकं फ्रेमवर्क जरी बनवलं तरी उद्याचा काळ सोपा जाणार आहे.
लेखकाचा संपर्क - ९५१८७६२६४३

बातम्या आणखी आहेत...