आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत तार ट्रॅक्टरवर पडल्याने सख्ख्या भावांचा जागेवरच मृत्यू, नांदेड तालुक्यातील भांडेगाव बुद्रुक येथील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीची काम करत असताना लोंबकळत असलेली विजेची तार अचानक ट्रॅक्टरवर पडल्याने ट्रॅक्टर चालक शेतकरी तारेला चिकटला. त्याचा जीव वाचवण्यासाठी गेलेला दुसरा भाऊही तारेला चिकटला. या घटनेत दाेघेही सख्खे भाऊ असलेले तरुण शेतकरी जागीच मृत्युमुखी पडले. ही घटना नांदेड तालुक्यातील भांडेगाव बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी ८ वाजेदरम्यान घडली.  
 

पाटील कुटुंबातील तीन भावांपैकी दोन भाऊ शेतात राबतात. रमेश सदाशिव पाटील (३०) व मंगेश सदाशिव पाटील (२७) हे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे सकाळी चहा पिऊन  ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले. त्यांच्या शेतावरून विजेची तार गेली असून, ती विद्युत तार कित्येक महिन्यापासून लोंबकळत आहे. दरम्यान शेतीची मशागत करणे भागच असल्याने मंगेश पाटील यांनी ट्रॅक्टरद्वारे शेतात पाळी मारत असताना   विद्युत  तार  तुटून ट्रॅक्टर वर पडल्याने मंगेश पाटीलतारेला चिटकले. ही बाब मोठा भाऊ   रमेश यांच्या लक्षात येताच त्यांनी भावाला वाचवण्यासाठी   काठीने तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र काठीमधून तार निसटून ती रमेश  यांच्याही अंगावर पडून रमेश यांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच सरपंच लालबाग कांबळे, हणमंत पाटील डेंगे, सतीश डेंगे, सटवाई घाटे, विठ्ठल लामतुरे, वैजनाथ जाधव यांनी  विद्युत प्रवाह बंद करून दोघांना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात  दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.


वर्षभरात कुटुंबातील तिघांचा मृत्यू
विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत झालेल्या रमेश व मंगेश या दोघांचे वडील मागील वर्षीच मरण पावले होते. एकाच वर्षात तिघांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगेश पाटील यांचे मागील वर्षीच लग्न झाले. रमेश पाटील यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. ही घटना समजताच पाटील कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. तर भांडेगाव गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोन सख्ख्या भावांना जीव गमवावा लागला. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


तार दुरुस्तीची लेखी मागणी
लोंबकळत असलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. कामात कसूर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या दोघा भावांचे मृतदेह  विच्छेदनासाठी मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.