Home | Maharashtra | Marathwada | Nanded | Brothers die after taking alcohol remedies

दारू सोडण्याचे औषध घेतल्याने भावांचा मृत्यू, हदगावात भाेंदू डाॅक्टरमुळे गमवावे लागले प्राण

प्रतिनिधी | Update - Dec 07, 2018, 10:41 AM IST

संजय ज्ञानदेव मुंडे (४०) व विजय ज्ञानदेव मुंडे (३५) रा. तळेगाव ता. परळी जि. बीड या सख्ख्या भावंडांना दारूचे व्यसन होते.

  • Brothers die after taking alcohol remedies

    नांदेड - हदगाव शहरातील एका भोंदू डॉक्टरकडे दारू सोडवण्यासाठी आणलेल्या दोन सख्ख्या भावांना दारू सोडवण्याच्या औषधामुळे आपला जीव गमवावा लागला. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. तथापि, रात्री उशिरा या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी दारू सोडवण्याचे औषध देणारा डॉक्टर रवींद्र पोधाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    संजय ज्ञानदेव मुंडे (४०) व विजय ज्ञानदेव मुंडे (३५) रा. तळेगाव ता. परळी जि. बीड या सख्ख्या भावंडांना दारूचे व्यसन होते. हे भाऊ हदगाव येथील डॉ. रवींद्र पोधाडे या खासगी डॉक्टरकडे दारू सोडवण्यासाठी आले होते. डॉ. रवींद्र पोधाडे याने दुपारी दोघांनाही औषध दिले. औषध प्राशन करून ही भावंडे तसेच सोबतचे लोक कारने परतीच्या प्रवासाला लागले. हदगावपासून सुमारे ३० किलोमीटरपर्यंत जाताच संजय मुंडे यांनी पोटात आग होत असल्याची व जीव कासावीस होत असल्याची तक्रार केली. त्यामुळे सोबतच्या लोकांनी त्यांना पिण्यास पाणी दिले. त्यानंतर संजय झोपी गेले. नांदेडला पोहोचल्यावर त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठत नसल्यामुळे एका खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी संजय मृत्यू पावल्याचे सांगितले. त्याच वेळी विजय मुंडे यांनाही त्रास होऊ लागला. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर बरे वाटू लागल्याने सर्व जण संजयचा मृतदेह घेऊन पुढे गावाकडे निघाले. आणखी पन्नास किलोमीटर पुढे गेल्यावर विजय मुंडे यांनाही पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यांना लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    भाेंदू डॉक्टरला अटक
    नांदेड येथून दोन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तळेगाव येथील त्यांच्या नातलगांनी धाव घेत लोहा गाठले. त्यांनी मोबाइलवर हदगाव पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी त्यांना हदगाव येथे येण्यास सांगितल्याने सर्व नातलगांनी हदगाव पोलिस ठाणे गाठले. तो पर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. दोघाही भावंडांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले असून डॉ. रवींद्र पोधाडे याच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटकही करण्यात आल्याचे ठाणेदार काकडे यांनी सांगितले.

Trending