आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांचा वाद मिटवत दाेघा भावांनी गावरस्त्यासाठी दिली 60 लाखांची जमीन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जमिनीच्या वादामुळे ५० वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेला शीवरस्ता सरपंचांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे खुला करण्यात आला आहे. महादेवपूर येथील डावरे बंधूंनी आजमितीस सुमारे ६० लाख रुपये मूल्य असलेली २० गुंठे जमीन रस्त्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आजुबाजूच्या चार गावांचे सुमारे सात किलाेमीटरचे अंतर कमी झाले आहे. 

 

नाशिक तालुक्यातील महादेवपूर, जलालपूर, दुगाव व डंबाळेवाडी या गावांना जाेडणारा शीव रस्ता सुमारे ५० वर्षांपूर्वी बंद करण्यात आला हाेता. रस्त्याची जागा डावरे यांच्या मालकीची असल्याची नाेंद उताऱ्यावर हाेती. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला हाेता. रस्ता बंद झाल्यामुळे पलीकडे राहणाऱ्या १०० ते १५० शेतकऱ्यांना पाच ते सात किलाेमीटरचे वाढीव अंतर पार करून जावे लागत हाेते. त्यामुळे वाहतुकीचा खर्चदेखील वाढला हाेता. हा रस्ता सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात हाेती. तत्कालीन आमदार बबन घाेलप, जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी गावांना भेट देऊन रस्त्याचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रयत्न केले हाेते. मात्र, कैलास डावरे व कैलास तांबडे यांच्यातील वादामुळे यश येत नव्हते. 

दरम्यान, महादेवपूर ग्रामपंचायतीला तीन महिन्यांपूर्वी लाभलेले सरपंच विलास सांडखाेरे यांनी दाेन महिने सातत्याने या प्रश्नावर कैलास डावरे यांच्याशी चर्चा करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत सदस्या अलका डावरे यांच्याशीही सल्लामसलत करून हा रस्ता माेकळा झाल्यास कशा प्रकारे गावांचा विकास हाेऊ शकेल हे पटवून दिले. त्यामुळे कैलास डावरे व त्यांचे चुलत बंधू राजू डावरे यांनी त्यांच्या मालकीची २० गुंठे जागा गावासाठी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या निर्णयामुळे आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनादेखील फायदा हाेणार आहे.

 

शेतकऱ्यांचा फायदा 
रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी माेठ्या प्रमाणात खर्च लागत हाेता. मात्र, डावरे बंधूंनी गावाच्या विकासासाठी दिलेल्या याेगदानामुळे आता शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आजुबाजूच्या चार गावातील शेतकऱ्यांना फायदा हाेईल. - विलास सांडखाेरे, सरपंच महादेवपूर 

बातम्या आणखी आहेत...