आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपचा संकल्प : राज्यात एक तरी उमेदवार निवडून आणणार - सुरेश साखरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीप्ती राऊत 

नागपूर  - ९ ऑक्टोबर २००६ राेजी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम गेल्याची बातमी कळली आणि नागपुरातील कार्यकर्त्यांनी १४ ऑक्टोबरच्या मायावतींच्या सभेसाठी उभारलेला मंडप उतरवायला सुरुवात केली. मात्र, थोड्याच वेळात मायावतींचा फोन आला. नागपूरची सभा होणारच असल्याचे त्यांनी कळवले. ‘कांशीराम यांना ज्या महाराष्ट्राने बाबासाहेबांच्या विचारांची दिशा दिली त्या महाराष्ट्रातून कांशीराम यांचे मिशन पुढे घेऊन जाण्याचा आपण निर्धार करूया,’ असा निर्धार त्यांनी केला आणि ती सभाही झाली. या घटनेला १३ वर्षे उलटली, मात्र  कांशीराम यांच्या पक्षाचा ‘हत्ती’ विधिमंडळात पाेहाेचू शकला नाही. या वेळी बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे उत्तर नागपूरमधून रिंगणात आहेत. त्यांच्यासह  बसपच्या २७५ उमेदवारांच्या प्रचारासाठी १४ ऑक्टोबरला नागपूरमध्ये मायावतींची सभा हाेत आहे.

९ आॅक्टाेबर राेजी कांशीराम यांची पुण्यतिथी झाली.  यानिमित्ताने नागपूरच्या सम्यक चौकातील पार्टी कार्यालयात बसपचे कार्यकर्ते जमले होते. मायावतींची सभा आणि पक्षाच्या पदयात्रेची तयारी करत होते. कांशीराम यांच्या प्रतिमेला वंदन करून या वेळी तरी बसपचा एक तरी उमेदवार निवडून आणू, असा संकल्प त्यांनी केला.
२०१४ च्या निवडणुकीत उत्तर नागपूरमध्ये बसपचे उमेदवार माजी सनदी अधिकारी किशाेर गजभिये दुसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचे डॉ. मिलिंद माने विजयी झाले होते. आता गजभिये यांनी बसप साेडून काँग्रेसचा हात पकडला आहे. या वेळी या मतदारसंघात भाजपचे आमदार डॉ. मिलिंद माने, काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत आणि बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे अशी तिरंगी लढत होत आहे.
 

> प्रश्न : महाराष्ट्रात बसप का रुजली नाही?
साखरे : रिपाइं नेते कायमच काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना- भाजपच्या दावणीला बांधून राहिले. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन दलित बहुजन वर्ग शासक बनू शकला नाही. या वेळी तर रिपाइंला ‘कमळा’वर लढायला लागणे हे आंबेडकरी जनता सहन करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय पक्षाचे अधिकृत चिन्ह असलेला हत्ती ‘बसप’ चालवत आहे. त्यामुळे यंदा ‘हत्ती’ निश्चित चालेल.
 

> प्रश्न : वंचित काय परिणाम होऊ शकतो?
साखरे : लोकसभेत वंचित आघाडीची लाट होती, पण आता त्यांचेच लोक सोडून गेल्याने ती ओसरली. जे सोडून गेले ते भाजपमधून आले होते आणि भाजपमध्येच गेले. त्यामुळे वंचित कुणाला मोठे करते हे कळले आहे.
 

> प्रश्न : प्रचाराचे तुमचे मुद्दे काय?
साखरे : विदर्भाचे आश्वासन भाजपने पाळले नाही. देशात २ कोटी नवीन रोजगाराचे आश्वासनही हवेत गेले. नवीन राेजगार तर दूरच, जुने उद्याेगही बंद पडले, राेजगार गेले. हेच आमचे मुद्दे आहेत.
 

> प्रश्न : बसप-वंचित एकत्र का नाही?
साखरे : आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता. आमचे प्रभारी रामचर राजवर व प्रकाश आंबेडकर यांची बैठकही झाली. जागांचा आग्रह नव्हता, मतांचे विभाजन हाेऊ नये म्हणून आमचा आग्रह हाेता. मात्र, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.