आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्ध, धनगर, मुस्लिम उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीकडून पसंती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक अडसूळ 

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर नेतृत्व करत असलेली वंचित बहुजन आघाडीने राज्यात विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर आपले उमेदवार लढत असल्याचा दावा केला आहे.  वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी देताना भटके-विमुक्त, दलित आणि मुस्लिम समाजाला प्राधान्य दिले आहे. 

वंचितच्या २८८ उमेदवारांच्या यादीत मराठा समाजाचे १८ उमेदवार आहेत. मात्र, यात एकही ब्राह्मण नाही. पक्षाने १८ टक्के उमेदवार भटके-विमुक्त (एनटी) जात गटातील दिले आहेत. त्यात बंजारा, वंजारी आणि धनगर या जातींना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जातीचे (एससी) १७ टक्के उमेदवार आहेत. या जातगटातील ५० उमेदवारांपैकी ४२ उमेदवार नवबौद्ध समाजाचे आहेत. तर केवळ ८ उमेदवार हे चर्मकार, मोची आणि ढोर अशा अनुसूचित जातीचेच, पण हिंदूधर्मीय आहेत.

इतर मागास (ओबीसी) गटाला वंचितने चांगले प्रतिनिधित्व दिले आहे. वंचितच्या यादीत ११ टक्के (३२ उमेदवार) ओबीसी आहेत. त्यात हलबा कोष्टी, माळी, सोनार, कुणबी, लेवा पाटील या छोट्या जातींच्या बहुसंख्य उमेदवारांचा समावेश आहे.
 

२८८ मतदारसंघांत एकही ब्राह्मण उमेदवार दिला नाही
 

नऊ टक्के (२५) उमेदवार मुस्लिम
आघाडीतून एमआयएम बाहेर पडल्यानंतरही वंचितने ९% (२५) उमेदवार मुस्लिम दिले आहेत. त्यातही मुस्लिमांतील शिकलगार, धोबी, पटवे अशा मागासवर्गीय जातगटातील उमेदवारांना वंचितने प्राधान्य दिले आहे. 
 
अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राज्यात २५ मतदारसंघ राखीव आहेत. त्या सर्व मतदारसंघांत वंचितने (९ टक्के) उमेदवार दिले आहेत. आदिवासींतील माना, गोंड, गाेवारी या लहान जमातींना वंचितने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलेले दिसते.
 

महिलांना चार टक्के उमेदवारी
विशेष म्हणजे, वंचितने एक ख्रिस्ती, एक शीख, एक ईस्ट इंडियन आणि एक मारवाडी उमेदवार दिला आहे. तसेच २८८ पैकी १२ उमेदवार (४ टक्के) या महिला दिलेल्या आहेत. 
 

केवळ २५ धनगर उमेदवार
विधानसभेला आम्ही धनगर समाजाचे १०० उमेदवार देऊ, अशी लोकसभा निवडणुकीत (२०१९) घोषणा केली होती. प्रत्यक्षात वंचितने केवळ २५ उमेदवार धनगर दिले आहेत.
 

वंचितचा प्रवास 
> लोकसभा २०१९
वंचित -एमआयएम आघाडीने २०१९ च्या लोकसभेला राज्यातील सर्व ४८ जागा लढवल्या होत्या. त्यातील १ जागा एमआयएमने जिंकली. वंचितने राज्यात ७.२ टक्के (४१ लाख) वैध मते घेतली होती.  

> २०१४ विधानसभा
विधानसभेला भारिपने ७० जागा लढवल्या होत्या. एक जागा जिंकली. पक्षाने ०.८९ टक्के मते मिळवली होती.
 

कुटुंबशाही अन् एकजातीय राजकारणातून बाहेर काढण्याचा वंचितचा प्रयत्न
प्रस्थापित राजकीय पक्षांनी गेल्या ७० वर्षांत महाराष्ट्रातील वंचित ठेवलेल्या अलुतेदार, बलुतेदार, कारागीर व अल्पसंख्याक धर्मीयांना उमेदवारी दिली नव्हती. कुटुंबशाही अन् एकजातीय राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा वंचितचा प्रयत्न आहे. 
- अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी