आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरून जोरदार गदारोळ झाला. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर एका प्रश्नाचे उत्तर द्यायला उभे राहताच विरोधी खासदारांनी ‘गोळी मारणे बंद करा, देश तोडणे बंद करा’ची घोषणा दिली. तसेच भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्या भाषणादरम्यान माकप, राजद, तृणमूलच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्या आधी प्रवेश यांनी सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. लोकसभेत काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, लोक राज्यघटना वाचवण्यासाठी नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत. त्यांच्या हातात राज्यघटना आणि तोंडात राष्ट्रगीत आहे. मात्र, त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जात आहेत. एमआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले की, जामियामध्ये मुलींना मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्यांवर सरकार अत्याचार करत आहे. त्यांना लाज वाटली नाही. एका मुलाचा डोळा गेला हे माहीत आहे का? आम्ही जामियाच्या मुलांसोबत आहोत. अनुराग यांनी गेल्या आठवड्यात एक निवडणूक सभेत ‘देशाच्या गद्दारांना ....’ अशी घोषणा दिली होती, तर प्रवेश यांनी सरकारी जागेवरून मशिदी हटवण्याची धमकी दिली होती. यामुळे या दोघांचाही विरोधकांकडून जोरदार विरोध होत आहे. निवडणूक आयोगानेही याबाबत दखल घेतली आहे.
लोकसभा : प्रवेश म्हणाले, पंतप्रधानांना मारण्याचे सांगितले जाते
भाजपचे प्रवेश वर्मा लोकसभेत म्हणाले की, शाहीनबागमध्ये पंतप्रधान व गृहमंत्र्यांना मारण्याचे सांगितले जाते. ज्यांना जिनांचे स्वातंत्र्य हवे आहे, जिहाद हवाय तेच असे सांगतात. काश्मीर व आसामला वेगळे करण्याचे बोलले जाते. हे राजीव फिराेज खानचे सरकार नाही. मोदींचे आहे. सीएए मागे घेणार नाही.
टि्वटर : गिरिराज म्हणाले- तुमच्यासाठी पाकिस्तान बनवला
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी ओवेसींच्या वक्तव्याविरोधात ट्विट केले. त्यांनी म्हटले की, ओवेसीसारखे कट्टरतावादी जामिया आणि एएमयूसारख्या शिक्षण संस्थांमध्ये विष पसरवून देशद्रोही सैन्य बनवत आहेत. गिरिराज यांनी असेही म्हटले की, तुमच्यासाठी पाकिस्तान बनवला आहे, आता आम्हाला सुखाने राहू द्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.