आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना : हिमाचल प्रदेशात पावसामुळे इमारत काेसळली; १४ ठार, १७ जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलन  -  हिमाचल प्रदेशातील साेलन येथे रविवारी संध्याकाळी एक जीर्ण इमारत काेसळून झालेल्या अपघातात मृतांची संख्या वाढून १४ झाली आहे. साेमवारी इमारतीचा काेसळलेला मलबा हटवल्यानंतर आणखी सहा मृतदेह सापडले. साेलन शहरातील नहान एक्स्प्रेस वेवरील कुमारहाटी येथे ही दुर्दैवी घटना घडली. राज्यात अधूनमधून पाऊस सुरू असून, या पावसामुळे अनेक जीर्ण इमारतींना धाेका निर्माण झाला आहे. ही घटना सतत काेसळणाऱ्या पावसामुळेच घडली असल्याचे सांगण्यात आले. 


साेलन शहरातील कुमारहाटी भागातील संबंधित इमारतीत एक हाॅटेलही हाेते. या हाॅटेलमध्ये काही नागरिकांसह लष्कराचे अनेक जवान हाेते. अनेक जण भाेजन करत असतानाच ही घटना घडली. त्यात रविवारी सुरुवातीला ६ ते ७ जवान इमारतीच्या मलब्याखाली दबून ठार झाले हाेते. मात्र, दुसऱ्या दिवशी साेमवारी मलबा हटवल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ हाेऊन ती १४ झाली. त्यात १३ जवान व इतर एका नागरिकाचा समावेश आहे. तसेच १७ ज‌ण जखमी झाले असून, त्यात ११ इतर नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती साेलन जिल्ह्याचे उपायुक्त के.सी.चेमन यांनी दिली. 


घटनेनंतर तत्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. त्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, लष्कराचे जवान, पाेलिस, हाेमगार्ड व स्थानिक नागरिकांसह अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात रविवारी संध्याकाळी दाेन जणांचे, तर साेमवारी आणखी सहा जणांचे मृतदेह सापडले. आता बचावकार्य पूर्ण झाले असून, काेसळलेल्या इमारतीतील जखमी व मृतांची संख्या स्पष्ट झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विवेक चंदेल यांनी सांगितले. तसेच हिमाचल प्रदेशचे मु‌ख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देऊन या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच जखमींची कुमारहाटी व सिव्हिल रुग्णालयासह महर्षी मार्कंडेश्वर मेडिकल महाविद्यालयात जाऊन चाैकशी केली. या घटनेची जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत चाैकशीची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी इमारत मालकाच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.  

 

अशी घडली घटना 
इमारत परिसरातील डगशाई छावणीतील आसाम रायफल्सचे जवान रस्त्याच्या शेजारी असलेल्या भाेजनालयवजा रहिवासी भागात रविवारी दुपारी ४ वाजता पार्टी करत हाेते. या वेळी मुसळधार पावसामुळे कमकुवत झालेली संबंधित इमारत अचानक काेसळली. सिमल्यापासून सुमारे ५५ किमी अंतरावर कुमारहाटी-नाहन मार्गावरील या इमारतीत लष्कराचे जवान व नागरिक उपस्थित हाेते. सर्वप्रथम पहिला मजला काेसळला व त्यानंतर संपूर्ण इमारती काेसळली.

 

२८ जणांना वाचवण्यात यश, मृतांत इमारत मालकाची पत्नीही 
या घटनेनंतर सुरक्षा दलांसह एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. त्यामुळे २८ जणांना वाचवता आले. त्यात १७ जवानांसह ११ नागरिकांचा समावेश आहे. तसेच मरण पावलेल्यांमध्ये संबंधित इमारत मालकाच्या पत्नीचाही समावेश आहे. दरम्यान, संबंधित इमारत निश्चित मानकांनुसार उभारण्यात आलेली नव्हती. या घटनेस इमारतीच्या बांधकामास मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांसह इमारत मालक जबाबदार आहे, असा आराेप स्थानिक नागरिकांनी केला. 


मृत जवान आसाम रायफल्सचे : 
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांत आसाम रायफल्सच्या जवानांचा समावेश आहे. सुभेदार राज किशोर, सुभेदार बलविंदर, सुभेदार विनोद, सुभेदार अजितकुमार, सुभेदार प्रदीपचंद, नायब सुभेदार योगेश, सुभेदार ईश्वर सिंह, सुभेदार हेम होमंग, नायब सुभेदार एम.नोबिन, सुभेदार कुमार चौराही, सुभेदार सुरजित शरामा, सुभेदार राजबहादूर, सुभेदार लाल सन्स अशी त्यांची नावे आहेत. शवविच्छेदनानंतर सर्व जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीय व नातेवाइकांकडे साेपवण्यात आले, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.


 

बातम्या आणखी आहेत...