आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी पेठेत इमारत कोसळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 सोलापूर - नवी पेठेतील एक जुनी इमारत रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळली. रस्त्यावर कोणी नसल्याने जीवितहानी टळली. ही घटना दिवसा घडली असती तर कोणाचा तरी बळी गेलाच असता. ही इमारत धोकादायक अाहे, परंतु न्यायप्रविष्ठ बाब असल्याने महापालिकेने कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या घटनेनंतर जेसीबीच्या साहाय्याने वरचा धोकादायक भाग पाडून टाकण्यात आला. अग्निशामक दल, पोलिस आणि महापालिकेची यंत्रणा वेळीच घटनास्थळी पोहाचली. पुढील सोपस्कार पूर्ण करून रस्ता मोकळा करण्यात आला. 

गंगाविहीर येथील फॅशन कॉर्नरच्या बाजूला असलेल्या इंडिया जनरल स्टोअर्सवरील छत अचानक कोसळले. ही इमारत साधारण ७० वर्षांपूर्वीची आहे. माळवद कोसळल्याने त्याचा मोठा आवाज झाला. माती अन् लाकडांचा ढीगच रस्त्यावर पसरला. धुळीने परिसर माखून गेला. इंडिया जनरल स्टोअर्स नऊ वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर त्याचे मालक एजाज काखंडीकर घरी निघून गेले. रात्री साडेदहाला इमारत कोसळल्याची वार्ता कळल्यानंतर ते लगेच घटनास्थळी आले. पोलिसांना खबर देताच त्यांनी अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले. या दलातील कर्मचाऱ्यांनी धोकादायक भाग काढण्याचा प्रयत्न केला. त्याने काम झाले नाही. त्यामुळे जेसीबी मागवण्यात आली. रात्री ११ वाजता जेसीबीच्या साह्याने धोकादायक भाग पाडून रस्ता मोकळा करण्यात आला. 

नऊला दुकान बंद केले 
रात्री नऊला दुकान बंद करून घरी गेलो. त्यानंतर दुकानाच्या वरचा भाग कोसळल्याचा निरोप आला. दुकानासमोरील रस्त्यावर कोणी विक्रेते बसत नाहीत. बाजूला हातगाड्या थांबतात. दिवसा या रस्त्यावर ग्राहकांची नेहमी ये-जा असते. रात्री उशिरा ही घटना घडल्याने जीवितहानी नाही. आम्ही १९६१ पासूनचे भाडेकरी आहोत. एजाज काखंडीकर, भारत जनरल स्टोअर्स 

बातम्या आणखी आहेत...