Home | Maharashtra | Vidarva | Akola | Buldana News: More than 2 lakh Farmers Will Be Benefitted With PM Honor Scheme

जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रधानमंत्री सन्मान निधी

प्रतिनिधी | Update - Feb 08, 2019, 11:33 AM IST

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना शेतकरी कुटुंबाची यादी करणे सुरू

 • Buldana News: More than 2 lakh Farmers Will Be Benefitted With PM Honor Scheme

  बुलडाणा - केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे शासन परिपत्रक जारी झाले असून, जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन हेक्टर लागवडीखालील क्षेत्रासाठी सहा हजार रुपये अर्थसाहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने गावनिहाय शेतकऱ्यांची यादी करण्यास आज ७ जानेवारीपासून सुरुवात केली आहे.


  बुलडाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र वहितीखाली असून यापैकी ९८ टक्के क्षेत्रावर दरवेळी कमी अधिक प्रमाणात पेरणी होत असते. या शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम १० फेब्रुवारी पर्यंत केले जात आहे. त्या दृष्टीने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करता जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय समिती बुलडाण्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डिस्ट्रीक्ट डोमेन एक्स्पर्ट, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सदस्य असून निवासी उपजिल्हाधिकारी समन्वय अधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी असणार आहे. तसेच तालुकास्तरीय समिती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक निबंधक सदस्य असून तहसीलदार नोडल अधिकारी असणार आहे. तसेच ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी प्रमुख असणार आहे. तर ग्रामसेवक, कृषी सहायक व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव सदस्य असणार आहे.


  असा आहे कार्यक्रम
  १० ते १५ फेब्रुवारी शेतकरी कुटुंबाच्या याद्या तपासून आवश्यक माहितीचे संगणकीकृत मध्ये संकलन करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या परिशिष्ट अ व ब नुसार शेतकरी कुटुंबाची यादी गावामध्ये प्रसिद्ध करण्यात येवून त्यावर हरकती असल्यास १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येतील. यादीत यथायोग्य दुरुस्ती असल्यास पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबाची अंतिम यादी २० ते २१ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात संगणकीकृत रित्या सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसील स्तरावर प्राप्त यादीचे तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी करून संगणकीकृत माहिती महाऑनलाइनने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान पडताळणी करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे.


  ३० हजार शेतकरी पात्र ठरणार
  बुलडाणा तालुक्यातील कृषीगणनेनुसार ५६ हजार सातबारे आहेत. तर लागवडीखालील क्षेत्र ४६ हजार ६२६ हेक्टर इतके आहे. यातील दोन हेक्टर लागवडीखाली असलेल्या ३० हजार शेतकरी या योजनेत पात्र ठरू शकतात. परंतु, आजपासून दोन हेक्टर शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा या मध्ये कमी अधिक संख्या होऊ शकत असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली.


  आधार व बँक खाते आवश्यक
  कुटुंबनिहाय वर्गीकरण केल्यानंतर केंद्र शासनाच्या निकषानुसार अपात्र असलेल्या शेतकरी कुटुंबाची स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. माहितीमध्ये शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील आवश्यक असणार आहे. सामाईक खातेदार शेतकरी असल्यास अशा खातेदारांपैकी एका खातेदाराकडून स्वयं घोषणापत्र घेतल्या जाणार आहे.

  -सुरेश बगळे, तहसीलदार बुलडाणा


Trending