आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेले बैल मिळाले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संकटे यायची असतील तर त्यांना अंत नसतो. एकामागून एक ती येतातच. गेल्या आठवड्यातली गोष्ट. माझ्या शेतातून खुंट्यावरची बैलजोडी गायब झाल्याचे शेतातील माणसाने मोबाइलवर सांगितले. माझा मुलगा सचिन व मी असे दोघांनी मोटारसायकलवरून शेत गाठले. चोहोबाजंूनी शेतात फिरून पाहिले. आजूबाजूच्या शेतात जाऊन शेतकर्‍यांकडे चौकशी केली. पण बैलांचा पत्ता लागेना. सध्या असे दुष्काळाचे दिवस. कोणी दुष्मनीने डाव साधला की काय, अशी शंका जाणवत होती. मी सर्जा-राजाला आणले तसे त्यांची देखभाल व्यवस्थितपणे करत होतो. मुके जनावर, पण त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच माझा मळा फु लून गेला. त्यांच्यामुळेच घरात सुबत्ता नांदत होती. म्हणून माझा जीव त्यांच्यात गुंतलेला होता. शेतात पाऊल ठेवताच ती मान वर करून माझ्याकडे पाहत असत. जवळ जाताच घुंगरांच्या माळांचा आवाज करत. मीही प्रेमाने त्यांच्या पाठीवर हात फिरवत होतो. आज माझ्या मळ्यातून ती दोघेही नाहीशी झाली. हा अनुभव नवीनच होता. बैलांची चोरी आजपर्यंत आमच्या शिवारात कधी झालेली नव्हती. आमच्या शेजार्‍याने हिरवा मका लावला होता. त्या भागात असतील म्हणून मी तेथेही जाऊन पाहिले. पण सर्जा-राजा दिसेनात. बरीच शेते पायाखालून घातली, पण त्यांचा शोध काही लागेना. मनात विचारांचे काहूर माजले होते. कोणी बैलांना घेऊन बाजारात गेले तर नसेल? कारण आज बैलाची किंमत चाळीस हजारांच्या पुढे जाते. दोन-तीन दिवसांनंतर समजले, ही जोडी कोणीतरी पळवल्याचा संशय पक्का झाला. खाटकांच्याच तावडीत देण्याचा अज्ञातांचा प्रयत्न होता. मी प्राणाची पर्वा न करता, माग काढत त्या ठिकाणी पोहोचलो. मला पाहताच ते चोरटे पळून गेले. बैलांनी माझ्याकडे धाव घेतली. माझ्या डोळ्यांतून कितीतरी वेळ अश्रूंच्या धारा वाहत होत्या.