आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळामुळे बैलजोडी विकली; पेरणीसाठी स्वत: जुंपून घेतले, राबू लागले जनावरासारखे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब - दुष्काळामुळे बैलजोडी विकली. मात्र आता पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे चक्क मंगरूळ येथील शेतकरी कुटुंबाने स्वत: नांगराला जुंपून घेत सोयाबीन पेरणी चालू केली आहे. मुलीचे लग्न करण्यासाठी या कुटुंबाला बैलजोडी विकावी लागली. आता पेरणीसाठी या कुटुंबाला बैलासारखे राबावे लागत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची काय आवस्था झाली आहे, याचे ही विदारक चित्र यावरून स्पष्ट होते.  


मागील चार-पाच वर्षांपासून अल्प पावसामुळे शेतकरी हैराण आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून गेले.  पेरणीसाठी पाणी सोडा शेतकऱ्यांच्या मदतीला असलेल्या सर्जा-राजा यांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचाही मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. काही शेतकऱ्यांनी पशुधन जगण्यासाठी चारा छावण्यांचा आधार घेतला तर काही शेतकऱ्यांनी दुष्काळाला कंटाळून पोटच्या लेकराप्रमाणे संभाळ केलेले पशुधन कवडीमोल भावाने विक्री केले आहे. त्यामुळे यावर्षी ट्रॅक्टर अथवा इतर शेतकऱ्यांच्या बैलजोडी भाड्याने घेऊन पेरणी करण्याची वेळ आली आहे. 
 

तरी प्रश्न अनुत्तरीत : एकीकडे उशिरा पाऊस पडल्याने हातचा मूग आणि उडदाचं पीक हातून गेलं. म्हणून शेतकरी सोयाबीनच्या पिकावर जास्त भर देत आहे. पुढे पावसाने साथ दिली आणि चांगला हमीभाव मिळाला तर शेतकरी सुखी होणार आहे. मात्र एक-दोन एकर शेती असलेल्या आणि बैलजोडी नसलेल्या फरताडे कुटुंबीयांच्या शेतात त्यांची उपजीविका भागेल इतकं उत्पन्न निघेल का? हा प्रश्न आहे.

 

कर्जाचा डोंगर वाढतच गेला
कळंब तालुक्यातील मंगरूळ या गावचे रहिवासी असलेले भास्कर फरताडे यांना चार मुली व एक मुलगा आहे. जेमतेम दोन एकर कोरडवाहू शेती असून परिस्थिती बिकट आहे. मागील वर्षी शेतात सोयाबीनची पेरणी केली. मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतातील पिकांवर वरवंटा फिरला आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर झाला. 

 

कर्ज फेडण्यासाठी बैलजोडी विकली
सध्या उशिरा का होईना जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्यामुळे बळीराजा पेरणीच्या लगबगीला लागला आहे. कोणी ट्रॅक्टरने तर कोणी आपल्या बैलजोडीने शेत नांगरून पेरणी करत आहेत.  मुलीच्या लग्नामध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी बैलजोडी विकली. या दांपत्याकडे बैलजोडी  नसल्याने आणि नवीन बैलजोडी घेण्यासाठी पैसे नसल्याने या दांपत्याने स्वतःच बैलांच्या जागी नांगराला जुंपून घेतले.