आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता वैनीचं गाऱ्हाणं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅबी परेरा


सर्वे आले का बे ?
होय बे आलो !‘चला तर, हात जोडा, आणि गाऱ्हाणं सुरू करूया. आपण जरी नागपूरकर असलो तर आज मी या महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्रीण आणि पर्मनंट वैनी या नात्याने, या होळीच्या सणानिमित्त आपण आज या ठिकाणी कोकणी पद्धतीने गाऱ्हाणं घालणार आहोत....

‘बा देवा, बारा गावच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा, सध्या रेशीमबागेपासून शाहीनबागेपर्यंत सगळीकडे अस्थिर वातावरण झालंय. आम्हाला काही नको पण या विदर्भासहित महाराष्ट्राचं आणि काश्मीरसहित हिंदुस्थानच भलं व्हावं या हेतूने आम्ही तुला हे गाऱ्हाणं घालत आहोत. बा म्हाराजा, एव्हढी मेहनत करून, खडसे, तावडे, बावनकुळेचा काटा काढून, १०५ सीट जिंकून, भल्या पहाटे शपथविधी उरकूनसुद्धा महाराष्ट्राचे लाडके मामु, माझे मिष्टर, नागपूरकरांचे लाडके णाणा आज माजी मुख्यमंत्री झालेत. त्यांना हा आघात पचविण्याची सहनशक्ती दे आणि त्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवून असलेल्यां चंद्रकांतदादांना पाचदहा वर्षे एक्स्ट्रा सहनशक्ती दे.

बा म्हाराजा, संपूर्ण महाराष्ट्राचं काही होत नसेल तर तातडीने आमच्या साहेबांना निदान स्वतंत्र विदर्भाचा तरी मुख्यमंत्री करा.

बा म्हाराजा, मी एरव्ही क्रुझच्या टोकाला जाऊन सेल्फी काढणे, मोदीजींना फादर ऑफ कंट्री म्हणणे, प्लास्टिक सर्जरी करून हनुवटीला टोक करणे, रॅम्पवर चालणे, म्युझिक व्हिडिओ करणे अशा  काहीही उठाठेवी करत असले तरी आमचे हे मला प्रेमाने “लाखमोलाची ठेव” म्हणतात. आमच्या साहेबांकडे सत्ता होती तेव्हा आमच्या बँकेतले लोक म्हणायचे की बँकेला आपल्या प्रगतीसाठी या अमृत-ठेवीत इंटरेस्ट आहे, पण अमृत-ठेवीला बँकेत काडीचा इंटरेस्ट नाही. आता तर ते म्हणतात नवऱ्याच्या अहंकारामुळे पक्षाचे नुकसान झाले आणि बायकोच्या आगाऊपणामुळे बँकेचे नुकसान झाले. बा रवळनाथा, आमच्या माथ्यावरचे हे असले किटाळ दूर कर रे बाबा!आमचे राजकीय सल्लागार म्हणतात, २०१९ च्या निवडणुकीत “निवडून आल्यावर आम्ही (म्हणजे अभिनयसम्राट मी आणि तुमची गानसाळुंकी वैनी) कुठल्याच अँथम आणि व्हिडिअोच्या भानगडीत पडणार नाही!” हे आश्वासन णाणांनी दिलं असतं तर णाणा आज मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर असते. बा म्हाराजा, माझ्या जोडीला शॉपिंगला आल्यावर आपण विधानसभेत नाहीत ह्याची आमच्या लाडक्या णाणांना जाण असू दे. मागे णाणांनी विधानसभेत कविता गायली “मी पुन्हा येईन” त्याच दिवशीच्या माझ्या शोमधे मी गाणं गायलं “कल हो ना हो”! लोक णाणांच्या विधानसभेतील भाषणात आणि माझ्या स्टेज शोमधे ओढूनताणून सबंध जोडतात. अशा लोकांना सद्बुद्धी दे रे म्हाराजा!“अमृता स्वतंत्र आहे, ती माझं  ऐकत नाही” असं आमच्या णाणांनी मध्यंतरी जाहीररीत्या सांगितलं. हल्लीचा त्यांचा वाढलेला आक्रस्ताळेपणा हा त्यांचे मी ऐकत नसल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रावर काढलेला राग आहे असं जनतेला वाटू देऊ नकोस रे म्हाराजा.
कालपरवाच एका टीव्ही वाहिनीला बाइट देताना मी सात्त्विक संतापाच्या भरात आदित्य ठाकरेंला रेशमी किडा बोलले. उद्यापरवा पुन्हा शिवसेनेसोबत युती करायची झाली तर, “मला रेशमी किडा नव्हे तर रश्मीज किड म्हणायचं होतं” असं सांगून सारवासारव करता येऊदे आणि ते त्यांना पटूदे रे म्हाराजा! माझा फेमिना मासिकावरील फोटो किंवा तत्सम  इतरत्र छापलेले फोटो आणि म्युझिक व्हिडिओ भागवत काकांच्या, रेशीमबागेतील संस्कृती रक्षकांच्या किंवा अपर्णा रामतीर्थकर बाईच्या नजरेस पडू देऊ नकोस.
बा म्हाराजा, माझ्याकडे कितीबी कलागुण असले तरी केवळ नवरा मुख्यमंत्री असल्यामुळेच मला चान्स मिळाला अशी टीका लोक करतात म्हणून माझं गाऱ्हाणं आहे, यापुढे कोणत्याच मुख्यमंत्र्याला माझ्यासारखी टॅलेन्टेड बायको देऊ नकोस किंवा माझ्यासारख्या टॅलेन्टेड बाईच्या नवऱ्याला मुख्यमंत्री करू नकोस रे म्हाराजा! इथे या गाऱ्हाण्यासाठी माझ्यासोबत जमलेल्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना इतर पक्षातून आलेल्या नेत्यांसाठी आपल्या ग्रामसदस्यत्वाचा, सरपंचपदाचा, पंचायत सदस्यत्वाचा, झेडपी सदस्यत्वाचा, नगरसेवकपदाचा, आमदारकीचा हक्क सोडण्याची त्यागबुद्धी दे रे म्हाराजा!‘अजून कोणाचं काही मागणं देवापुढे मांडायचं राहिलंय का रे?’ ‘नाही ...  नाही.. सगळ्यांचं झालं रे म्हाराजा!’

संपर्क- ९९८७८७२५५४
 

बातम्या आणखी आहेत...