Crime / भरदिवसा फक्त पंधरा मिनिटांत कुप्रसिद्ध घरफोड्याने चोरले ७१ तोळे सोने

वर्णन व पद्धतीवरून आरोपीस केली अटक , राज्यासह परराज्यातही करायचा घरफोड्या 
 

प्रतिनिधी

Jun 16,2019 12:29:00 PM IST

औरंगाबाद - मराठवाड, विदर्भ, खान्देशासह कर्नाटकमध्ये फिरता फिरता केवळ दिवसाच घरफोडी करणारा कुख्यात घरफोड्या किशोर तेजराव वायाळ (३८, रा. मेरा, ता. चिखली, जि. बुलडाणा) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. १३ जून रोजी वैजापूरमधील प्रकाश लालचंद छाजेड, (६२, रा. मर्चंट कॉलनी) यांच्या घरात त्याने शिर्डीला दुचाकीवरून जात असताना गावात शिरत रेकी करून अवघ्या पंधरा मिनिटांत ७१ तोळे सोने, ७९५ ग्रॅम चांदी व रोख रक्कम चोरून नेली होती. चोवीस तासांत स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत त्याला मुद्देमालासह अटक केली.


घरातील सामान अस्ताव्यस्त आढळले
व्यवसायिक छाजेड व त्यांचे भाऊ ऋषभ हे शेजारी राहतात. त्यांची आई मानकवर या ऋषभ यांच्यासोबत राहतात. १३ जुन रोजी ऋषभ व त्यांची पत्नीपुण्याला कामानिमित्त गेले होते. त्याच दिवशी प्रकाश यांच्या घरी गुरूमहाराज आल्याने धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या घराला कुलूप लावून शेजारी राहणाऱ्या प्रकाश यांच्या घरी गेल्या. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रकाश यांच्या सून शलाका या मिक्सर आणण्यासाठी ऋषभ यांच्या घरी गेल्या. परंतू तेव्हा दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला आढळला. घरातील सामान अस्ताव्यस्त आढळून आले. कुटूंबाला हा प्रकार कळताच त्यांनी घरात धाव घेतली. वैजापुर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऋषभ व त्यांची पत्नी घरी परतल्यावर आतील खोलीतील सोन्याचे ७१ तोळे ८०० ग्रॅम आणि आठशे ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि १७ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी घरफोडीची उकल करत वायाळ ला अटक केली. पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक फौजदार गफार पठाण यांनी कारवाई पार पाडली.


शिर्डीला जाताना केली मोठी घरफोडी
वायाळ हा राज्यासह परराज्यातही कुख्यात घरफोड्या आहे. औरंगाबाद गुन्ह शाखेने त्याला ४ फेब्रवारी रोजी समर्थनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात अटक केली होती. तेव्हा त्याच्याकडून १६ घरफोड़्या उकल करण्यात यश आले होते. त्यात शिक्षा भोगत असताना २४ एप्रिल, २०१९ रोजी जामिनावर सुटला. १३ जून रोजी तो त्याचा फरार सहकारी आकाश प्रकाश पवार, रा. साखरखेडा याच्यासह दुचाकीवरुन शिर्डीला जात होता. तेव्हा त्याने वैजापुर मध्ये घरफोडीच्या उद्देशाने प्रवेश केला. दुचाकी लांब अंतरावर उभी करुन तो पायी मर्चंट कॉलनीत मध्ये फिरत गेला. तेव्हा छाजेड यांच्या घराला कुलूप लावलेले दिसले व समोरील घरात धार्मिक कार्यक्रम असल्याचे समजले. त्याने थेट कुलूप तोडत घरात प्रवेश करत कपाटातील दागिने ठेवलेली बॅग उचलून बाहेर पडला व दुचाकीवरुन चालला देखील गेला. हातात मोठे घबाड लागल्याने जवळ असलेल्या मोठ्या तिजोरीकडे त्याने दुर्लक्ष केले.

वर्णन व पद्धतीवरून अटक
घरफोडी झाल्यानंतर पथकाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात संशयित दुचाकीवर आलेला दिसला. भरदिवसा घरफोडी करणाऱ्यांमध्ये वायाळ कुप्रसिध्द आहे. वर्णनावरून व पध्दतीवरुन एका पथकाने तत्काळ वायाळ चा शोध घेण्यास सुरूवात केली. खबऱ्यामार्फत वायाळ चा मार्ग काढत त्याला साखरखेडा ते दुसरबीड रस्त्यावर सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या घराजवळच ठेवलेली बॅग जप्त केली असता त्यात सर्व मुद्देमाल जप्त केला.

X
COMMENT