आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटीलॅन्डमध्ये होलसेल कापड विक्रीचे सहा दुकाने फोडली; 28 लाखांची रोकड लंपास 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अमरावतीचे कापड मार्केट प्रचंड मोठे आहे. यातच मागील काही वर्षांपासून नागपूर मार्गावर होलसेल कापड विक्रीचे तीन मार्केट सुरू झाले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या नागपूर महामार्गावरील बोरगाव धर्माळे परिसरातील सिटीलॅन्ड कापड मार्केटमधील सहा दुकानात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. ११) पहाटेदरम्यान चोरी केली. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी या मार्केटमध्ये तब्बल २९ सुरक्षारक्षक तैनात होते, तरीही चोरट्यांनी सहा दुकानांमध्ये प्रवेश करून २८ लाख २३ हजारांची रोख लंपास केली आहे. या चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

अमरावतीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सिटीलॅन्ड कापड मार्केटमध्ये सुमारेे दीडशे ते दोनशे होलसेल व रिटेल कापड विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी केवळ अमरावतीचेच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कापड व्यावसायिक खरेदीसाठी येतात. यातही दर गुरूवारी कापड मार्केटमध्ये अधिक उलाढाल होते. दरम्यान नेहमीप्रमाणे गुरूवारी रात्री व्यापाऱ्यांनी आपआपले दुकानं बंद केली आणि मार्केट रात्री दहा वाजताच्या सुमारास बंद झाले. विशेष म्हणजे या ठिकाणी दरदिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल हाेते तसेच प्रत्येक दुकानांमध्ये लाखो, कोटी रुपयांचा माल अाहे. तसेच मार्केट परिसर प्रचंड मोठा असल्यामुळे सुरक्षेसाठी रात्रीच्यावेळी २९ सुरक्षारक्षक तैनात असतात. गुरूवारी रात्रीसुद्धा या ठिकाणी २९ सुरक्षारक्षक तैनात होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एका निर्माणाधीन दुकानाच्या वर जाऊन एका बाजूला एक असलेल्या सहाही दुकानातील एअर डक्टींगमधून दुकानात प्रवेश केला आणि २८ लाख २३ हजार ४४० रुपये लंपास केले. 

 

दिनेश हरिष पुरूषवाणी (३०, रा. कृष्णानगर) यांच्या शगुन साडी दुकानातून ४ लाख ५० हजार रुपये, मोहन गवलानी (५२, रा. व्हीआयपी कॉलनी) यांच्या मोहन टेक्सटाईलमधून १० लाख ९३ हजार ४४० रुपये, अमरलाल कन्हैय्यालाल बख्तार (६०, रा. बालाजीनगर) यांच्या साई साडीजमधून पाच लाख रुपये, प्रदीप निश्चलदास सोजरानी (४५, रा. एकविरानगर, सीतारामबाबानगर) यांच्या वर्षा साडीमधून ३ लाख ३० हजार, मनिष अर्जुनदास केशवानी (४५) यांच्या श्रीहरी होलसेल डेपोमधून २ लाख २५ हजार आणि मोती गोविवंशम पिंजानी (४७, रा. रामपुरी कॅम्प) यांच्या वंशिका साडी दुकानातून २ लाख २५ हजार अशी एकूण २८ लाख २३ हजार ४४० रुपयांची रोख चोरट्यांनी लंपास केल्याचे व्यापाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता मार्केटमध्ये चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस उपायुुक्त यशवंत सोळंके, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंजाबराव वंजारी, नांदगाव पेठचे ठाणेदार कैलाश पुंडकर आपआपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. 

 

या चोरीमुळे शहर पोलिसांसमोर चोरट्यांनी आणखी एक तगडे आव्हान उभे केले आहे. मागील दोन महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या मोठ्या रकमेच्या चोरीमध्ये आणखी एका चोरीची भर पडली आहे. मागील दोन महिन्यात तरी शहर पोलिस मोठ्या घरफाेडी व चोरी प्रकरणातील चोरट्यांना अटक करू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. 
 
चोरटे डक्टींगमधून आले अन् डक्टींगमधूनच गेले 
सिटीलॅन्डमधील श्रीहरी होलसेल दुकानाला लागून असलेले दुकान रिकामे असल्यामुळे त्याचे शटर उघडे होते. त्याच ठिकाणाहून चोरटे वर चढले आणि त्यांनी एकाला एक लागून असलेल्या सहा दुकानांंच्या डक्टींगमधून दुकानात प्रवेश केला. विशेष म्हणजे म्हणजे दुकानात ज्या ठिकाणी डक्टींगमधून चोरटे बाहेर निघाले त्याठिकाणी जेमतेम एक ते सव्वा फुट लांब आणि अडीच ते तीन फुट रुंद इतकी कमी जागा आहे, तरीही चोरटे त्यामधून उतरले, यावेळी डक्टींगमधून दुकानात उतरण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील नवीन साडीचा वापर केला. रोख घेऊन त्याच ठिकाणाहून बाहेर निघाले. 

 

पोलिस पथक नागपूरला 
दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या एका चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून, त्या चोरट्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिस पथक चोरट्याच्या शोधात नागपूरला रवाना करण्यात आले आहे. -यशवंत सोळंके, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १, अमरावती. 

 

सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद 
चोरी झालेल्या सहाही दुकानांमध्ये सीसीटीव्ही लागलेले आहेत. मात्र काही दुकानांमध्ये रात्री सीसीटीव्ही बंद करून ठेवण्यात येते. दरम्यान, श्रीहरी होेलसेल डेपोमध्ये चोरटे दुकानात आल्याचे दिसत आहे. त्यापैकी एका चोरट्याचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये आला आहे त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...