आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- प्रेयसींवर पैसे उधळण्यासाठी तसेच काही जणींना जाळ्यात ओढण्यासाठी एकाने शालेय मित्रांच्या मदतीने टोळी तयार करून दरोडा तसेच जबरी चोरी केल्याचे पुण्यात उघडकीस आले आहे. या टोळीने पुण्यात ३८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. या वेळी त्यांच्याकडून १७ लाख १६ हजार २१४ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामध्ये ४०२ ग्रॅम सोने, पाच ग्रॅम चांदी आणि ११ दुचाकींचा समावेश आहे. यातील मुख्य सूत्रधार हुक्या हा आलिशान गाड्या वापरून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर पैसा उधळत असल्याचेही समोर आले आहे.
ऋषिकेश ऊर्फ हुक्या श्रीकांत गाडे (२२,रा.सुवर्णयुग मित्रमंडळ, अप्पर इंदिरानगर), गौरव ऊर्फ लाल्या सुहास फडणीस (२७,रा.पर्वतीदर्शन), चाँद फकरुद्दीन शेख(२०,रा.बिबवेवाडी), गणेश बाळासाहेब कांबळे(२१,रा.अप्पर सुप्पर), सूर्यकांत किसन कोळी (२३,.घोरपडी पेठ), तोहीत तय्यब काझी(२८,रा.घोरपडी पेठ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
या टोळीचा म्होरक्या हुक्या गाडे हा चोरीच्या वाहनांचा वापर करून कोयत्याचा धाक दाखवत नागरिकांना लुटत होता. त्याच्यावर खुनाचे दोन व खुनाच्या प्रयत्नांचा एक गुन्हा दाखल आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातून तो जून २०१८ मध्ये कारागृहाबाहेर पडला. यानंतर त्याने त्याच्या शालेय मित्रांना एकत्र करून जून २०१८ मध्ये एक टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून त्याने दरोडा, जबरी चोरी व वाहनचोऱ्यांचे सत्र सुरू केले होते. दरम्यान, तो साथीदारांसह कोंढवा येथील खडी मशीन चौकात एक पेट्रोल पंप लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार अमजद पठाण व पोलिस नाईक अंकुश जोगदंड यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना ग्रीन पार्क सोसायटीच्या कंपाउंडलगत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे तीन दुचाकी, दोन कोयते, दोन सत्तूर, एक फायटर, तीन लाल मिरची पावडरच्या पुड्या, पेपर स्प्रे, नायलॉन दोरी असा २ लाख ८ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी आणि वाहनचोरीचे ३८ गुन्हे केले असून १०० वर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी वर्तवली आहे.
इतरांकडूनही चोरीच्या पैशांतून प्रेयसींची हौस
येरवडा परिसरातील म्हाडा कॉलनीत मामाचा एकाशी वाद झाल्यानंतर तलवारीने त्याने वार केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. त्याचे इतर सर्व साथीदार कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात कारागृहात आहेत. जून २०१८ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने शाळेतील वर्गमित्रांना एकत्र करून पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू केले होते. उच्च राहणीमान ठेवून महागड्या गाड्या वापरत, विविध महाविद्यालयांतील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात आेढून तो फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने एका तरुणीशी लग्न करून तो घराचा मूळ पत्ता बदलून राहत असताना सापडला. यातील दोघांनी चोरीचे पैसे प्रेयसीवर खर्च केल्याचेही समोर आले आहे.
बडोदा बँकेच्या ४३ लाखांच्या लुटीतही आरोपी
ऋषिकेश ऊर्फ हुक्या गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो दहावी नापास आहे. लहानपणी त्याचे वडील आईला सोडून गेले असून त्याचा मामा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. २०१६ मध्ये जेजुरी येथे बडोदा बँकेची ४३ लाख रुपयांची रक्कम लुटण्याच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे. सन २०१७ मध्ये मुळशी तालुक्यातील पाैड येथे त्याने मित्राच्या भावाचा खून केला असून त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. कोंढवा येथे प्रेयसीला २०१७ मध्ये जाऊन मारल्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. मात्र, सबळ पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी न्यायालयात त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले नाही व त्याची सीआरपीसी १६९ नुसार निर्दोष मुक्तता झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.