आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाने अचानक ब्रेक दाबले, मागच्या काचेतून खाली पडून दोन विद्यार्थी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- धावत्या स्कूल बसच्या मागील बाजूच्या आपत्कालीन खिडकीची काच फुटल्यामुळे दोन मुले बसमधून खाली पडून जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास नगर रस्त्यावरील लोखंडी पुलावर घडली. ५७ सीटची क्षमता असलेल्या या बसमध्ये चक्क १०० विद्यार्थ्यांना मेंढरांसारखे कोंबले होते. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मुले बसच्या काचेवर आदळली अन् तेजस संजय धोंगडे (८) व सम्राट सुरेंद्र अभंग (८, रा. रांजणगाव शेणपुंजी) हे दोघे खाली पडून जखमी झाले. छावणी पोलिसांनी बस जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. बसमधील विद्यार्थी रांजणगाव शेणपुंजी येथील शिवाजी विद्यालयाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

रांजणगाव शेणपुंजी येथील विद्यार्थ्यांना खोकडपुऱ्यातील शिवाजी हायस्कूल येथे गोवर, रुबेलाची लस टोचण्यासाठी आणले होते. दुपारी लसीकरण झाल्यानंतर सर्व १०० विद्यार्थी एमएच २० डब्ल्यू ९७५० या बसमधून परतत असताना छावणीतील लोखंडी पुलावर अचानक चालकाने ब्रेक दाबले. त्यामुळे विद्यार्थी बसच्या मागच्या आपत्कालीन खिडकीच्या काचेवर आदळले. काच फुटून तेजस व सम्राट खाली पडले. हे पाहून भेदरलेल्या मुलांनी आरडाओरड केल्याने चालकाने बस थांबवली. दोन्ही मुलांना उपचारासाठी तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. तेजसच्या डाव्या डोळ्याजवळ आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर सम्राटला मुका मार लागला आहे. सुदैवाने बसच्या मागे मोठे वाहन नसल्याने विद्यार्थी बचावले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश सुरवसे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बस ताब्यात घेऊन छावणी पोलिस ठाण्यात आणली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या वाहनाने रांजणगावला पाठवले. पोलिसांनी चालक कडूबा रानोबा वाघमारे (५५, रा. कैलासनगर) याला ताब्यात घेतले आहे. अपघाताची माहिती मिळताच घाबरलेल्या पालकांनी शाळेत गर्दी केली होती. सायंकाळी इतर विद्यार्थी सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 

 

मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार 
एकच शाळा दोन ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पाहणी केली होती. या संस्थेला दोन वेळा मान्यता रद्द करण्यात येईल, अशी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, संस्थाचालकांनी दुर्लक्ष केले. याबाबत जिल्हा परिषद सीईओंशी चर्चा करून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली. 

 

कारवाई करणार 
हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला. क्षमतेपेक्षा अधिक मुलांना बसमध्ये बसवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कलम २७९, ३३७ व इतर कलमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. बस जप्त करण्यात आली असून चालकही ताब्यात आहे. - श्रीपाद परोपकारी, पोलिस निरीक्षक, छावणी 

 

काच खिळखिळी असल्याने फुटली 
५७ आसन क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल १०० मुले कोंबण्यात आली होती. त्यामुळे बस गच्च भरली होती. काही मुले मागच्या सीटवर उभी होती. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ही मुले काचेवर आदळली. काच खिळखिळी असल्यामुळे ती फुटली आणि विद्यार्थी खाली पडले, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गाडीतील सर्व मुले घाबरलेली असल्यामुळे पोलिसांनी रात्रीपर्यंत कोणाचाही जबाब नोंदवला नाही. शाळेची बस खराब असल्यामुळे दुसऱ्या शाळेची बस मागवली होती, अशी माहिती उपनिरीक्षक सुरवसे यांनी दिली. 

 

स्थलांतराची प्रक्रिया सुरू 
शाळेची कागदोपत्री मान्यता शहरात असली तरी विद्यार्थी मागील काही दिवसांपासून रांजणगावातच शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण १४० विद्यार्थी असून त्यांना शिकवण्यासाठी ४ शिक्षक शहरातून रांजणगावात येतात. सध्या शाळेच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक घारुळे यांनी दिली. 

 

तीनशे मीटरनंतर चालकाला जाग 
काच फुटून दोन विद्यार्थी खाली पडल्याचे बस चालक कडूबा वाघमारे याला सुमारे तीनशे मीटर पुढे गेल्यानंतर समजले. विद्यार्थी आणि रस्त्यावरील वाहनचालकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघमारे यांनी बस थांबवून जखमींना घाटीत नेले. 

 

लस देण्यासाठी शहरात का? 
रांजणगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना लस देण्यासाठी औरंगाबादला का नेले, याची 'दिव्य मराठी'ने माहिती घेतली असता, संबंधित शाळेची कागदोपत्री मान्यता शहरातील श्री शिवाजी प्राथमिक विद्यालय, खोकडपुरा येथील असल्याचे समोर आले. प्रत्यक्षात ही शाळा रांजणगावात भरते. आरोग्य विभागाच्या वतीने त्या-त्या शाळेत लसीकरण केले जाते. मात्र, सोमवारी सकाळीच बजाजनगर-वडगाव कोल्हाटी येथील शांताई विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप काजळे यांच्या परवानगीने श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी स्कूल बस मिळवून १०० विद्यार्थ्यांना शहरात नेले. 

 

बातम्या आणखी आहेत...