आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राँग साइडने आलेल्या बसची पिकअप वाहनालाला जोरदार धडक; दोन जणांचा मृत्यू तर २७ प्रवासी जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालना-देऊळगाव राजा रोडवरील जामवाडी शिवारातील घटना

जालना- पैठण येथे नातेवाइकाचा दहाव्याचा कार्यक्रम आटोपून जाफराबादकडे परणाऱ्या पिकअप वाहनाला भरधाव एसटी बसने राँग साइडने येऊन जोराची धडक दिली. यात पिकअपमधील दोन महिला प्रवासी जागीच ठार झाल्या, तर इतर २७ प्रवासी जखमी झाले.


जालना-देऊळगावराजा रोडवर शनिवारी रात्री १०.४५ वाजता ही दुर्घटना घडली.  निर्मला कचरुबा जोशी (४०, टेंभुर्णी ता. जाफराबाद) व सिंधुबाई केशवराव शेवाळे (४०, बामखेडा, ता. भोकरदन) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमनबाई खंबाटे (८५) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

पिकअप चालक गजानन भिकाजी चिंधोटे (खासगाव, ता. जाफराबाद) हे पैठण येथून प्रवाशांना घेऊन जालनामार्गे गावाकडे निघाले होते. वाहनात १८ प्रवासी तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांनी गाडीची गती कमी ठेवली होती. तेवढ्यात चांदूर रेल्वे (जि. अमरावती) हून औरंगाबादकडे जाणारी भरधाव बस राँग साईडने समोरून येऊन पिकअपवर धडकली. यात दोन महिला प्रवाशी जागीच ठार झाल्या तर १६ जण जखमी झाले.  बसमधील ९ प्रवाशांनाही किरकोळ मार लागला. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या पिकअप वाहनाला  जखमी प्रवाशांनी हात देऊन थांबवले.  बसमधील प्रवाशांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.  पहाटे ४ वाजेपर्यंत जखमींवर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरूच होते. 

मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात
अपघातात मृत झालेल्या निर्मला जोशी व सिंधूबाई शेवाळे यांचे रविवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. 

विनंती करूनही बस भरधाव


प्रवाशी माधव लक्ष्मण गिते (ईसोली ता. चिखली जि. बुलडाणा) म्हणाले, देऊळगावराजा जवळ ढाब्यावर बस प्रवाशांना जेवण्यासाठी थांबली हाेती.  बस जालन्याकडे मार्गस्थ झाल्यानंतर बसचालक शफिक अहेमद हा बेदरकारपणे गाडी चालवू लागला. यामुळे कंडक्टरला सांगून बस हळूवार चालवण्याची विनंती प्रवाशांनी केली. मात्र, सदरील बसचालक नेहमीच अशी गाडी चालवतो असे कंडक्टर म्हणाला. त्यानंतर अवघ्या १०-१५ मिनिटांतच जालना शहरापासून जवळच समोरून येणाऱ्या पिकअपवर बस धडकली.
जखमींची नावे अशी  : गजानन नारायण बकाल (६०), अलका अंकुश जोशी (खासगाव), गयाबाई त्रिंबक बकाल (६५), भानुदास शामराव पाटोळे (६०), अनुसया गजानन बकाल (३५), कैलास त्रिंबक बकाल (५५), गजानन भिकाजी चिंधोटे (३५, खासगाव), विमल कृष्णा वैद्य (५०), रुपाली महादेव वैद्य (३७, अंढेरा ता. चिखली), माधव लक्ष्मण गिते (६०, इसोली), रुख्मणबाई माधव बकाल (८०, देऊळझरी), दिगंबर दिवटे (६०), गंगुबाई पांडूरंग मैंद (६०), कलाबाई भिवसन दिवटे (६५, जाफराबाद), सुमित वानखेडे (३५), शफिक अहेमद (४३, अमरावती), लीलाबाई धोंडीबा रोडगे (६५, वरुड), निर्मला राजू सोरमारे (३०, हसनाबाद), अनुसया उत्तम काळे (६५, बुलडाणा), वनमाला दशरथ सोरमारे (६५, नांजा), कमलबाई लिंबाजी खंबाटे (६५) लिंबाजी धोंडीबा खंबाटे (६५, दाभाडी), कांताबाई अंबादास जोशी (६०, टेंभुर्णी), सुशीला दगडू सोलाट (६०), सरस्वती गणेश सोलाट (३०, वरुड), मंगल शेषराव शेळके (३५, चनेगाव) अशी जखमींची नावे आहेत.

बसचालकाची चूक 

एसटी बसचालकाने बेदरकारपणे गाडी चालवून धडक दिली. जालना-देऊळगाव राजा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहन खाली घेणेसुद्धा शक्य होत नव्हते, असे पिकअप चालक गजानन चिंधोटे यांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.