आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील व्यावसायिकाचा खंडणीसाठी अपहरण करून खून, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्री घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली

पुणे- पुण्यात फुटवेअरचा व्यवसाय करणारे व्यापारी चंदन कृपादास शेवानी (वय४८, रा. बंडगार्डन) यांचे खंडणीसाठी अपहरण करून, त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीसाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समजताच येथील व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिसांनी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, शेवानी यांचा पुण्यात  फुटवेअर विक्रीचा व्यवसाय आहे. बंडगार्डन परिसरातील परमार पॅरेडाईज येथे ते वास्तव्यास होते. शनिवारी रात्री ते बाहेर पडले, मात्र उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी बंडगार्डन पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्रयत्न करुनही शेवानी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पाडेगाव येथे कॅनॉलजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची बातमी समजली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, डोक्यात गोळी झाडल्याचे आढळले. तसेच अंगावरही तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. पोलिासंनी दुपारी केलेल्या तपासानंतर हा मृतदेह मिसिंगची तक्रार असलेल्या व्यापारी चंदन शेवानी यांचा असल्याचे समोर आले.
पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याचे वृत्त आहे. त्यात दो करोड नही दिले, इसलिये गया, भाई के ऑर्डरसे ठोकना पडा,’ असे लिहिल्याचे समजते. त्यावरून शेवानी यांचे खंडणीसाठी अपहरण करून, नंतर त्यांची हत्या करण्यात आली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिक तपास अद्याप सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...