ब्ल्यू ओक लीफ / ब्ल्यू ओक लीफ

प्रीती ओसवाल

Jul 20,2011 01:45:05 PM IST

सकाळीच अजून एक इंग्रजी पुस्तक वाचून हातावेगळं केलं. ‘फाइव्ह लव्ह लँग्वेजेस’ गेरी चॅपमन (मानववंशशास्त्रज्ञ). हे पुस्तक खरं तर मला कोणीच सुचवलं नव्हतं. एक मैत्रीण पुण्यात आलेली असताना, तिला घेऊन आम्ही आमच्या आवडत्या बुक स्टॉलला गेलो होतो. संध्याकाळ संपत आली होती. दुकानाची मालकीण ओळखीची असल्याने आमच्याशी गप्पा करत होती.
तेवढय़ात तिने, त्यांच्याकडे अधूनमधून पाहुणचाराला येणारे एक फुलपाखरू एका पुस्तकात गढून गेलेले दाखवले. (हेच ते पुस्तक! पण मुद्दा इथे संपत नाही तर सुरू होतो!) इतक्या वर्षांत, संध्याकाळी ‘अँक्टिव्ह’ असलेल्या फुलपाखराला इव्हिनिंग ब्राऊन म्हणणारे माझे मन, त्या नेहमीच्या क्षुल्लक जीवाकडे दुर्लक्ष करणार इतक्यात त्याने (फुलपाखराने) आपले पंख हळूच उघडले. एक-दोनदा उघडझाप चालू राहिली. इतक्या हळुवार उघडझापीनेही माझ्या गालावर मात्र खूप जोरात चपराक बसली होती. त्याचा आतला भाग निळा-आकाशी निळ्यांची दाट छटा बघून मी चकित. यापूर्वी मी या प्रकारचे फुलपाखरू एकदाच बघितले होते. फणसाडच्या जंगलात कॅमोफ्लाजचा अत्युच्च नमुना.
खाली पडलेल्या, निर्वाणाप्रत जाणार्‍या पालापाचोळ्याशी साम्य करणारी पंखांची बाहेरची बाजू. पंख मिटून बसले की गळून गेलेले पानच ते. फुलपाखरं अधिक करून पंख मिटून बसतात. (पतंग-मॉथ मात्र अधिक करून पंख पसरून बसतात. राजस्थानच्या, रंगीबेरंगी घागरा नेसणार्‍या स्त्रियांनी एक जोरात गिरकी घेऊन त्या ओघातच खाली बसल्यावर तो घागरा कसा पसरेल तसे!) आणि पंख उघडले की आपल्यालाच त्या निळ्या खाईत ओढून घेईल असा खोल आणि अति निळा रंग. त्याचं इंग्रजी नावही तितकंच सर्मपक ‘ब्ल्यू ओक लीफ!’

X
COMMENT