आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज मागवून अभियंत्याने 200 तरुणांना फसवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुण्यात काही काळ अभियंता म्हणून नोकरी केलेल्या नीलेश अशोक वडमारे (२९, रा. कागदी वेस, बीड) याने नामांकित कंपनीत जागा असल्याचे सांगत ऑनलाइन जाहिरात देवून मराठवाड्यातील २०० तरुणांची ७ ते ८ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यासाठी त्याने आस्था कन्सल्टन्सी नावाची बनावट कंपनीही सुरू केली होती. २५ ऑक्टोबर रोजी त्याला बीड येथून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. 


२३ ऑक्टोबर रोजी स्कोडा कंपनीच्या एचआर विभागाला एक तरुणाने मेल पाठवून वडमारे याने दिलेले नियुक्तिपत्र खरे आहे का? अशी विचारणा केली होती. तेव्हा नियुक्तिपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. स्कोडाचे एचआर व्यवस्थापक विशाल बगारे, विधी अधिकारी महेंद्र कोल्हटकर यांनी तत्काळ ही बाब पोलिस अधीक्षक डॉ. सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली.

 

त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सायबर शाखेकडे सोपवण्यात आला. वडमारेने पुणे येथील निगडित आस्था कन्सल्टन्सीचे कार्यालय असल्याचे तरुणांना सांगितले होते. पोलिसांनी तपास केला असता असे कुठलेच कार्यालय त्या ठिकाणी नसल्याचे समोर आले. तांत्रिक तपास केल्यानंतर वडमारे हा बीडला असल्याचे कळले. २५ ऑक्टोबर रोजी बीड बसस्थानकावरून पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या वडमारेला सायबर शाखेच्या पथकाने अटक करून औरंगाबादेत आणले. पोलिस चौकशीत त्याने मराठवाड्यातील २०० ते २५० तरुण-तरुणींकडून प्रत्येकी पाच ते साडेसात हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. पोलिस निरीक्षक अशोक गिरी, मोहसीन सय्यद, कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


पत्नीच्या अकाउंटवर मागवत होता पैसे : वडमारे गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने दोन लग्ने केली असून पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात कलम ४९८ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या पत्नीपासून दोन, तर दुसऱ्या पत्नीपासून एक अपत्य आहे. दुसऱ्या पत्नीच्या अकाउंटवर तो तरुणांकडून पैसे मागवत असे. त्याचे आई-वडील शेतकरी अाहेत. त्याने नियुक्तिपत्र दिलेल्या कंपन्यांत त्याचे कोणी साथीदार आहेत का, याचा पोलिस शोध घेत असून त्याचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. 


माहिती देताना काळजी घ्या नोकरीसाठी रजिस्ट्रेशन करताना त्या संस्थेची संपूर्ण माहिती घ्या. आर्थिक व्यवहार करताना दक्षता बाळगा. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेशी संपर्क साधावा.

- डॉ. आरती सिंह, अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण पोलिस 

 

स्कोडा, व्हेरॉक, सीमेन्स, मेटल मॅन, एनआरबीची दिली नियुक्तिपत्रे 
वडमारे हा सिव्हिल इंजिनिअर आहे. नगर येथील एका महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्याने काही काळ नोकरी केली. मात्र, झटपट पैसे कमावण्याच्या लालसेने त्याने बनावट जॉब कन्सल्टन्सी सुरू केली. जस्ट डायल ९०० आणि क्विकरवर १७०० रुपये देऊन जाहिरात देत तरुणांकडून अर्ज मागवले. पगाराच्या २५ टक्के रक्कम मला द्यावी लागेल, असे सांगून स्कोडा, व्हेरॉक, सीमेन्स, मेटल मॅन, एनआरबी, मायलॅन, हेक्झाटेक या कंपन्यांची बनावट नियुक्तिपत्रे तरुणांना पाठवून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच ते साडेसात हजार रुपये घेतले. सुमारे २०० ते २५० जणांनी फसवणूक केल्याचे त्याने कबूल केले आहे. तो फक्त आऊटगोइंग सुविधा असलेला नंबर वापरत असे. पुण्यात काही जणांना प्रत्यक्ष भेटून पैसे घेतले होते. यातील बहुतांश तरुण अभियंता आहेत.

बातम्या आणखी आहेत...