आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चलो अयोध्या'चे वारे, किमान 300 शिवसैनिक होणार रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामजन्मभूमी अयोध्येला भेट देत असून तेथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. राज्याबाहेर शिवसेनाप्रमुख किंवा पक्षप्रमुखांची ही पहिलीच सभा असून त्यासाठी राज्यातून शिवसैनिक रवाना होणार आहेत. गुरुवारपासून शहरात या सभेचे आमंत्रण देण्यासाठी जागोजागी पोस्टर तसेच बॅनर झळकले आहेत. शहरातून किमान ३०० शिवसैनिक दोन दिवस अयोध्येत असतील, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.


गत महिन्यातच ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचे जाहीर केले होते. खासदार चंद्रकांत खैरे हे उत्तर प्रदेशचे संपर्कप्रमुख आहेत. त्यांनी यापूर्वीच तेथे जाऊन तयारी चालवली आहे. जिल्हाप्रमुख दानवे हेदेखील गत आठवड्यात अयोध्येत जाऊन आले. राज्याबाहेर प्रथमच शिवसेनेचा कार्यक्रम होत असल्याने त्यास मोठी गर्दी व्हावी, असे नियोजन करण्यात येत आहे. शहरात जागोजागी पोस्टर्स लावून या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. अयोध्येला कधी व कसे जायचे याचे नियोजन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

 

स्वत: खैरे चार दिवस आधी अयोध्येत तळ ठोकणार आहेत. कार्यकर्ते रेल्वेने, तर जिल्हाप्रमुख दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, सभागृह नेते विकास जैन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी विमानाने अयोध्येत दाखल होतील. कार्यकर्त्यांसाठी रेल्वेने जाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातून किमान ३०० जण जाण्याची शक्यता असली तरी हा आकडा वाढू शकतो, असे दानवे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...