आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू-ट्यूबवर व्हिडिअाे पाहून झेराॅक्स मशीनवर तयार केल्या १००च्या ७४३ नाेटा, दाेघे अटकेत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी | जळगाव : कलर झेरॉक्स मशीनच्या मदतीने नकली नोटा बनवण्याचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहून तांबापुरात राहणाऱ्या दोघांना झटपट श्रीमंत होण्याची लालसा झाली. त्यांनी झेरॉक्स मशीन खरेदी करून महिनाभरापासून घरातच नकली नोटा बवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. या नोटा चलनात आणल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळताच शुक्रवारी रात्री दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ७४ हजार ३०० रुपये किमतीच्या १०० रुपयांच्या ७४३ नोटांसह झेरॉक्स मशीन जप्त करण्यात आले.    अमजदखान अफजलखान (वय २२, रा. मोहंमदियानगर, तांबापुरा), शेख रईस शेख रशीद (वय २५, रा. मच्छी बाजार, तांबापुरा) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अमजदखान व रईस हे दोघे तांबापुरात राहत असल्याने दोघांची मैत्री आहे. दरम्यान, हातमजुरीची कामे करीत असलेल्या दोघांनी महिनाभरापूर्वी यू-ट्यूबवर नकली नोटा तयार करण्याचा व्हिडिओ पाहिला. यात एका झेरॉक्स मशीनच्या मदतीने हव्या त्या दराच्या नकली नोटा तयार करण्यात येत असल्याचे दाखवले होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांनी झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न रंगवले. यासाठी त्यांनी ९ हजार रुपये किमतीचे एक झेरॉक्स मशीन खरेदी केले. हे मशीन अमजदच्या घरातील एका खोलीत ठेवले होते. दिवसभर दोघे जण हातमजुरी केल्यानंतर मध्यरात्री अमजदच्या घरी जाऊन झेरॉक्स मशीनच्या मदतीने १०० रुपये दराच्या नकली नोटा तयार करीत होते. गेल्या महिनाभरापासून त्यांनी शेकडो नाेटा तयार केल्या. यातीन अनेक नोटा सध्या चलनातही फिरत आहेत. दरम्यान, मोह वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून ते मोठ्या प्रमाणात नोटा तयार करीत होते; परंतु या नोटा चलनात आणण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या. यासाठी रईसने पहूर येथील एका नातेवाइकास याबाबत माहिती देऊन खेड्यापाड्यात या नोटा चलनात आणून देण्याची विनंती केली. त्यानुसार त्याच्या नातेवाइकाने काही नोटा चालवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही माहिती लीक झाली. पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, पोलिस उपनिरीक्षक गुट्टे, अशोक महाजन, सुनील दामोदरे, रवींद्र पाटील, अनिल देशमुख, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख व दीपक पाटील यांच्या पथकाने पहूरपासून तपास सुरू केला. अखेर हा तपास तांबापुरा येथील अमजद व रईस यांच्यापर्यंत येऊन थांबला. शुक्रवारी रात्री दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांकडून नकली नोटा, झेरॉक्स मशीन ताब्यात घेतले आहे. दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली अाहे. दरम्यान, बनावट नाेटा तयार करणारे रॅकेट तर नाही ना? या अनुषंगाने पाेलिसांचे पथक कसून तपास करीत अाहे.    बनावट नाेटा ग्रामीण भागात चलनात अाणण्यासाठी नातेवाइकांना गळ घातली अन‌् तेथेच फुटले बिंग  नोटांची केली तपासणी  अमजद व रईस यांच्याकडून मिळून आलेल्या नोटांची तपासणी पोलिसांनी केली. गणेशनगर येथील दुकानदार विनीत आहुजा यांच्याकडे नोटा तपासण्याचे मशीन आहे. त्या मशीनमध्ये तपासणी केली असता अमजद व रईस यांच्याकडून मिळालेल्या नोटा नकली असल्याचे उघड झाले.    दोघे अल्पशिक्षित, मजुरीतून भरायचे पाेट  पोलिसांनी अटक केलेला अमजद हा दहावी नापास झालेला अाहे. त्याने पुढील शिक्षण घेतलेले नाही. तो घराेघरी जाऊन साबण, वॉशिंग पावडर विक्रीचे काम करून कुटुंबीयांना मदत करताे. तर रईस यानेही इयत्ता पाचवीपासूनच शाळा सोडली आहे. तो मिस्तरी काम करतो. दोघे जण अल्पशिक्षित व मजुरीचे काम करतात. या दोघांच्या पाठीमागे आणखी कोणी तरी मास्टमाइंट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात अाली. यापूर्वीही शहरात अशा प्रकारे नकली नोटा तयार करणारे रॅकेट मिळून आले होते. हेच रॅकेट अद्याप शहरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही शक्यता गृहीत धरून पाेलिस पथक तपासाची चक्रे फिरवित अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...