आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ- नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) संदर्भात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशभर असंतोष निर्माण झाल्याने जगभरात देशाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे असंतुष्ट नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.
गांधी शांती यात्रेदरम्यान यशवंत सिन्हा यांनी रविवारी सैफईमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या लखनऊतील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यशवंत सिन्हा म्हणाले की, सीएएवरून देशभरात आंदोलन सुरू आहे. यामुळे भारताची प्रतिमा मलीन झाली आहे. याला केेंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकार कारणीभूत आहे. सीएए आणि एनआरसीच्या घोषणेमुळे देशात भीतीचे वातावरण तयार झाल्याचा आरोप करत यशवंत सिन्हा म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायातील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. लोकांना भीतीच्या सावटाखालून बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. लोकांशी बोलायला हवे आणि त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करायला हवे, यामुळे देशात शांतता स्थापन होईल.
यशवंत सिन्हा पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार दमनकारी आहे. त्यांच्या इशाऱ्यावर उत्तर प्रदेशासह भाजप शासित राज्यांमध्ये सीएए आणि एनआरसीवरून सर्वात भयंकर स्थिती आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांचा आवाज दडपला जात आहे. देशाच्या आर्थिक स्थितीची चिंता करण्याऐवजी सरकार सीएए आणि एनआरसीच्या माध्यमातून लोकांचे लक्ष भटकावण्याचे काम करत आहे. या वेळी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते.
शहा, योगी यांची भाषा अशोभनीय : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाषा अशोभनीय आहे. सरकार सीएए मागे घेणार नाही आणि एनआरसीबाबत एक इंचही मागे हटणार नाही, असे अमित शहा म्हणतात, हे योग्य नाही. मोठ्या पदावरील मंत्र्यांच्या भाषा शैलीमुळेही देशात अशांततेची स्थिती आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाच्या संविधानाविरोधातच नाही तर देशाच्या मूलभूत संरचनेच्याही विरोधात आहे. नागरिकत्व देण्यासाठी सरकारकडे इतके अधिकार आहेत की, या कायद्याची कोणतीच गरज नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.