आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत समर्थनार्थ महासभा, औरंगाबादेत विरोधात महामोर्चा; घुसखोरांना हाकलण्याची भाषा शिवसेनेने आता बदलली असल्याची टीका

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई/ औरंगाबाद - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) राज्यात ठिकठिकाणी विरोध तसेच समर्थनार्थ मोर्चे निघत असल्याने तापलेले राजकीय वातावरण शुक्रवारी अधिकच तापले. राज्यातील महाआघाडी सरकारने या कायद्याच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपच्या नियोजित मोर्चाला परवानगी नाकारली. यामुळे आॅगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दुसरीकडे, या कायद्याच्या विरोधात शुक्रवारी सर्वात मोठा मोर्चा औरंगाबादेत निघाला. 

या मोर्चात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ही लढाई न्यायालयात लढून उपयोगाचे नसल्याचे सांगत न्यायालयेही धर्मनिरपेक्ष राहिलेली नाहीत, असा आरोप केला. औरंगाबादेतील या मोर्चात दीड लाख लोकांचा सहभाग होता, असा दावा केला जात आहे. 

  • ४० पेक्षा अधिक संघटनांचा औरंगाबादेत विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा

औरंगाबाद - हे न्यायालय आता धर्मनिरपेक्ष राहिलेले नाही. ते सरकारच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे एनआरसी, सीएएविरुद्ध न्यायालयात लढून उपयोग नाही. म्हणून या लढाईसाठी रस्त्यावरच उतरा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ४० पेक्षा अधिक संघटनांचा एनआरसी, सीएएविरोधी महामोर्चा शुक्रवारी विभागीय आयुक्तालयावर धडकला. त्या वेळी ते बोलत होते.  आमखास मैदानावरून निघालेल्या या मोर्चाला प्रचंड गर्दी होती. आयुक्तालयासमोर मिळेल त्या जागेवर लोक उभे होते. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. अॅड. आंबेडकर म्हणाले की, या कायद्यांविरुद्धची लढाई थांबणार नाही. ती २०२४ पर्यंत चालणार आहे. हिंदू-मुस्लिमांना एकत्रित लढावे लागेल. कारण न्यायालयात हा कायदा कसा संवैधानिक आहे, हे मांडण्याची तयारी सरकारकडून होत आहे. राजद खासदार मनोज झा म्हणाले की, आरपारची ही लढाई आपण आता जिंकत आहोत. आ. जितेंद्र आव्हाड यांनी ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असल्याचे सांगितले. 

  • सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

मुंबई - जाळपोळ करणाऱ्यांना सरकारकडून मोर्चे काढण्यास परवानगी मिळते आहे. परंतु, भाजप हा राजकीय पक्ष असूनही मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली जाते, असा दावा करत राज्यातील महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला.  भाजपने शुक्रवारी ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. परंतु, पोलिसांनी भाजपच्या या रॅलीला परवानगी नाकारली. त्यामुळे भाजपला केवळ सभा घ्यावी लागली. घुसखोरांना हाकलण्याची शिवसेनेची भाषा आता बदलली आहे. मोदी सरकार कुणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

  • टिळकांना अभिवादन करण्याची परवानगी का नाकारता?

टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची मंजुरी हे सरकार नाकारत असेल तर लोकमान्य टिळकांनी जो प्रश्न विचारला, तो विचारावाच लागेल की, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

  • नेहरूंनी दिलेला शब्द आता नरेंद्र मोदी पाळत आहेत...

अगोदर पं. नेहरू, नंतर राजीव गांधी यांचा नागरिकत्व कायद्यासाठी आग्रह होता. आज काँग्रेसच त्या विचारांना तिलांजली देत आहे. नेहरूंनी दिलेला शब्द मोदी पाळत आहेत, असे फडणवीस म्हणाले.