आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य; शिवसेनेचे ४, दाेन्ही काँग्रेसचे प्रत्येकी ३ मंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे सांगितले जात होते. हा विस्तार लवकर व्हावा अशी काँग्रेसची इच्छा आहे, तर पक्षांतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी मात्र तयार हाेत नव्हते. परंतु आता तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असून शुक्रवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. सर्वांचे खातेवाटपही त्याच दिवशी हाेण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरू असून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विस्ताराबाबत एकमत होत नव्हते. मंत्रिपद कोणाला द्यायचे यावर तिन्ही पक्षांमध्ये जोरदार खल सुरू आहे. काँग्रेसचे नेते नवी दिल्ली येथे जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर बैठका घेऊन नावे अंतिम करीत आहेत. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात काँग्रेसचे तीन मंत्री असतील आणि सोनिया गांधी यांनी तीन नावांना संमती दिली आहे. यामध्ये यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव असल्याचे सांगितले जाते. मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने याची पुष्टी केली नाही. नावे लवकरच कळतील असे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचेही तीन मंत्री असणार आहेत, तर शिवसेनेचे मात्र चार मंत्री असणार आहेत. राष्ट्रवादीमधून जितेंद्र आव्हाड यांचे नाव चर्चेत असून शिवसेनेकडून भास्कर जाधव, रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विस्तार

नागपूर येथे १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात भाजप विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखत असून त्यांना केवळ सहा मंत्री उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळेच महाविकास अाघाडीच्या सरकारचा लवकर विस्तार केला जाणार आहे. नव्या मंत्र्यांना कमीत कमी एक आठवडा तरी त्यांच्या विभागाचा अभ्यास करण्याची संधी मिळावी, असा विचार यामागे असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सध्याच्या मंत्र्यांकडे काही विभाग तात्पुरते सोपवले असून मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असेही शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.अजित पवारांनी सुरू केला सहकार खात्याचा अभ्यास

पुणे - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांचा दबाव असला तरी शरद पवारांनी तूर्त त्यांना बाजूलाच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या समावेशाबाबत साशंकताच आहे. मात्र तरीही अजित पवार यांनी सहकार व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या खात्याची सविस्तर माहिती मिळवण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. आजवर अनेक खात्यांची धुरा सांभाळणाऱ्या अजितदादांनी सहकार खात्याचा पदभार मात्र सांभाळलेला नाही, हे विशेष.