आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारत बंद’ : २१ विरोधी पक्ष रस्त्यावर; तरीही पेट्रोल २३ पैशांनी महागले, केंद्राने हात झटकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- पेट्रोल आणि डिझेल दरवाढ तसेच महागाईविरोधात सोमवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २१ विरोधी पक्ष भारत बंद करत रस्त्यावर उतरले. तथापि, महाराष्ट्रासह देशभरात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तोडफोडीच्या किरकोळ घटना वगळता बहुतांशी आंदोलन शांततेत पार पडले. 


तथापि, भारत बंदच्या दिवशीही पेट्रोल २३ पैसे, तर डिझेल २२ पैशांनी महाग झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकार व काही राज्ये व्हॅट घटवण्यास तयार नाहीत. भाजपने पत्रकार परिषद घेऊन बंदचा फज्जा उडाल्याचा दावा केला. या समस्येसाठी सरकार जबाबदार नसल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी हात झटकले. 


दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विराेधकांनी मोर्चा काढला. रामलीला मैदानावर संबोधित करताना राहुल यांनी मोदी सरकारने देशात फूट पाडली असून विरोधी पक्ष एकजुटीने सरकारला सत्तेतून खाली खेचेल, असा विश्वास व्यक्त केला.


राज्यासह देशात संमिश्र प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे, मुंबईत काँग्रेसपेक्षा मनसेच आक्रमक
मुंबई, पुण्यासह राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईत मनसे कार्यकर्ते अधिक अाक्रमक हाेते. रास्ता-रेल राेकाे करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना मनसेने काळे झेंडे दाखवले. मुंबईत ८८२ अांदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. ६ जणांना अटक केली तर इतरांना साेडून दिले. मुंबईत ताेडफाेडीचे ८ गुन्हे दाखल झाले. 


देश : बिहारमध्ये हिंसक वळण, इतरत्र शांततेत
बिहारमध्ये बंदचा सर्वाधिक परिणाम जाणवला. मुझफ्फरपुरात गोळीबारात एक तरुण जखमी झाला. राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश, तेलंगण, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुद्दुच्चेरी, ओडिशात संमिश्र प्रतिसाद होता. यूपी, दिल्ली, मिझोराम, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू व प. बंगालमध्ये बंदचा परिणाम अत्यंत कमी होता. विविध राज्यांत विरोधी पक्षांचे १० हजारांवर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.


महाराष्ट्र : अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी केला विरोध 
सातत्याच्या बंदला वैतागून लातूरमधील कापड लाइन येथील व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विरोध करत अाल्यापावली परत धाडले. उस्मानाबादेतील व्यापाऱ्यांनीही दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्ते अाणि व्यापाऱ्यांनी हरहर माेदीच्या घाेषणांनी प्रत्युत्तर दिले. केवळ दाेन तास बंद पाळून व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली.


व्हॅट कपात : पेट्रोल राजस्थानात अडीच, आंध्रात २ रुपये स्वस्त
- राजस्थान सरकारने व्हॅटमध्ये ४% कपात केल्याने इंधन अडीच रुपयांनी स्वस्त झाले. आंध्र प्रदेशनेही व्हॅट दोन रुपयांंनी कमी केला. मुंबईमध्ये व्हॅट सर्वाधिक ३९.१२% आकारला जातो.
- दिल्लीत पेट्रोल ८०.७३, तर डिझेल ७२.८३ रु. झाले. १५ ऑगस्टपासून पेट्रोल ३.६५ रुपये तर डिझेल ४.०६ रुपयांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.१२ तर डिझेल ७७.३२ रुपये झाले.


बंदमध्ये अडकले; अाजारी बाळाचा मृत्यू
बिहारच्या प्रमोद मांझींच्या २ वर्षीय मुलीला डायरिया झाला होता. उपचारांसाठी जहानाबादला जाण्यासाठी बंदमुळे गाडीच मिळाली नाही. रिक्षा मिळाली, तीही जाममध्ये अडकली. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बाळाचा अखेर तडफडून मृत्यू झाला. 


अमित शहा व पेट्राेलियम मंत्र्यांत खलबते
भाजपाध्यक्ष अमित शहांनी सोमवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात भेट घेतली. सूत्रांनुसार, दोन्ही नेत्यांत आगामी ओडिशा निवडणूक आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबाबत चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...