सत्ता संघर्ष / मुख्यमंत्रिपद देणार असाल तरच फोन करा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

विधानसभेची मुदत उद्या संपणार; फाेडाफाेडी राेखण्यासाठी काँग्रेस जयपूरला अामदार हलवणार

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 07:57:53 AM IST

मुंबई - तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यास एकच दिवस उरला असताना गुरुवारीही महाराष्ट्रातील सत्तास्थापनेतील गुंता अधिक वाढला आहे. राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिलेल्या भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद विकाेपाला गेल्याने निकालाच्या १५ दिवसांनंतरही राज्याला नवे सरकार मिळू शकलेले नाही.


मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली, मात्र सत्तास्थापनेचा दावा केला नाही. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्या, असा आक्रमक पवित्रा कायम ठेवला. ‘मला युती तोडायची नाही. मात्र लोकसभेला युती करताना जे ठरले त्याप्रमाणे वागणार असाल तरच फक्त पक्षश्रेष्ठींनीच मला फोन करावा,’ असा इशारा त्यांनी आमदारांच्या बैठकीत दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे शुक्रवारी अंतिम निर्णय घेऊ शकतात. तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला. दरम्यान, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्यपालांनी महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली.


दुसरीकडे, भाजप आमदार फाेडाफाेडीचा प्रयत्न करत असल्याचा विराेधकांचा आराेप आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आपले ४४ आमदार राजस्थानातील जयपूरमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत.शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, मुनगंटीवार म्हणतात त्याप्रमाणे जर जनादेश महायुतीला मिळाला आहे, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजप पुढाकार का घेत नाही? देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, या वक्तव्यावर राऊत म्हणाले - शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो. शिवसैनिक सत्तेसाठी खंजीर खुपसत नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, या भूमिकेवर उद्धव ठाकरे ठाम आहेत, आम्ही बहुमतही सिद्ध करू. आता सरकार स्थापन करताना कोणतीही दहशत, धमक्या, ब्लॅकमेलिंग, पोलिसी बळाचा वापर चालणार नाही.


गडकरी हे सुभाष देसाईंच्या संपर्कात : आठवले

रामदास आठवले म्हणाले, पाच तारखेला दिल्लीत नितीन गडकरींशी चर्चा केली तेव्हा भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी देखील बोलणे झाले. मी गडकरी यांना म्हटले की, तुमचे आणि उद्धव ठाकरेंचे संबंध चांगले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. तेव्हा ते म्हणाले, की, मी सुभाष देसाई यांच्या संपर्कात आहे. एवढ्याशा कारणावरून आम्ही वेगळे होणे योग्य नाही ठरणार. आमचे प्रयत्न सुरू आहेत.


राज्यपालांची अधिवक्त्यांशी चर्चा :

भाजप नेत्यांनी भेट घेतल्यानंतर संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे अधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना चर्चेसाठी राजभवनावर बोलावले आणि सत्ता स्थापनेच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्याबाबत चर्चा केली.


अगोदरची अडीच वर्षे घ्यायची की नंतरची ते चर्चेनंतरच ठरवू : उद्धव

शिवसेनेने गुरुवारी दुपारी मातोश्री येथे शिवसेनेचे ५६ आणि पाठिंबा देणारे ८ अशा एकूण ६४ आमदारांची बैठक बोलावली. त्यात उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेची युती करताना जे ठरले होते ते व्हावे, बाकी आमची काही अपेक्षा नाही. मुख्यमंत्रिपदी अगोदरची अडीच वर्षे घ्यायची की नंतरची ते चर्चेचनंतर ठरवू. आणि हे मान्य असेल तरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावे. शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत असू अशी ग्वाही आमदारांनी दिली. या आमदारांना वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा येथे मुक्कामी ठेवण्यात आले आहे.

भाजप नेते राज्यपालांना भेटले; कायदेशीर पर्यायांची माहिती घेतली : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली व नंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पाटील म्हणाले, ‘सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती राज्यपालांना दिली. महायुतीचेच सरकार यावे अशी जनतेची इच्छा आहे. परंतु या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे राज्यपालांना सांगितले. आम्ही कायदेशीर पर्यायही जाणून घेतले.’ दरम्यान, देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

या राज्यातही माेठे पक्ष सत्तेपासून हाेते दूर

गाेवा (2017)

४० जागांच्या गाेवा विधानसभेत १७ जागा मिळवत काँग्रेस सर्वात माेठा पक्ष ठरला हाेता. तर भाजपकडे अवघे १३ आमदार हाेते. मात्र स्पष्ट बहुमतापासून अवघ्या चार जागा दूर असलेल्या काँग्रेसला दूर सारत भाजपने अपक्ष व छाेट्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले हाेते.

मणिपूर (2017)

६० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला २६ तर भाजपला २० जागा मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली हाेती. मात्र, छाेट्या पक्षांच्या मदतीने भाजपने ३१ हा बहुमताचा आकडा गाठत आपले सरकार स्थापन केले व माेठा पक्ष असलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले.

कर्नाटक (2018) :

२२५ आमदारांच्या विधानसभेत १०५ आमदार असलेला भाजप माेठा पक्ष हाेता. त्यांना राेखण्यासाठी ३७ आमदारांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे सरकार काँग्रेसच्या (७८ जागा) मदतीने स्थापन झाले हाेते. नंतर भाजपने खेळी करून काँग्रेस-जेडीएसच्या १५ आमदारांना राजीनामे द्यायला लावले. त्यामुळे बहुमतासाठीचे संख्याबळ ११३ वरून १०२ वर आले आणि १७ महिन्यांतच भाजपचे सरकार सत्तारूढ झाले.

X
COMMENT