आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलग्रस्त गावांपासून उमेदवारही दूरच, प्रचार सामग्री पोहोचवण्यासाठी गावकऱ्यांचा ‘कुरियर’ म्हणून वापर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमाकांत दाणी

नागपूर - गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग मुळातच भौगोलिक दृष्टीने अतिदुर्गम. त्यातच नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे उमेदवार शेकडो गावांत फिरण्याचा धोका पत्करत नाहीत. कार्यकर्तेही तेथे जाणे टाळतात. भामरागड, एटापल्ली, लाहेरी व सिरोंचाला लागून शेकडो गावे  असलेल्या ३०% भागात निवडणुकीच्या कुठल्याही खाणाखुणा सापडत नाहीत. प्रचाराच्या दृष्टीने अशी दुर्गम गावे कव्हर करण्यासाठी उमेदवार तालुक्याच्या आठवडी बाजाराला येणाऱ्या गावकऱ्यांना गाठतात. अशा गावकऱ्यांचा ‘कुरियर’ म्हणून वापर करून त्या-त्या गावांपर्यंत आपली उमेदवारी पोहोचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र कायम आहे.

बहिष्काराची घोषणा नाही :
गडचिरोलीसह आरमोरी आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. अहेरी क्षेत्रात भामरागड आणि लाहेरीच्या पलिकडे असलेल्या शेकडो अतिसंवेदनशील व दुर्गम गावांमध्ये निवडणुकीचे कुठलेही वातावरण नसते. नक्षलवाद्यांच्या भीतीपायी उमेदवार तेथे पोहचू शकत नाही. याशिवाय कच्चे रस्ते, घनदाट जंगल, पहाडी प्रदेश या कारणांपायी देखील हा भाग उमेदवारांच्या दृष्टीने दुर्गम ठरतो. यंदा नक्षलवाद्यांकडून निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा झाली नसली तरी उमेदवार मात्र कमालीची सावधगिरी बाळगत आहेत. राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “मी ६ महिन्यांपासून मतदारसंघात फिरत आहे. मात्र, सिरोंचा आणि अहेरीचा बराचसा भाग राहिला आहे.. अहेरीत २९० पैकी २५० वर बुथ अतिसंवेदनशील आहेत. किमान १०० बुथ असे आहेत की जेथे कोणी जाण्याचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. पोलिस संरक्षण कामाचेच नाही. एक जवान काय सुरक्षा करणार? त्यामुळे येथे सावध रहावे लागते.”

गावकऱ्यांमार्फत होतो प्रचार
दुर्गम गावांमधून आठवडी बाजारात येणाऱ्या गावकऱ्यांचा प्रचाराचे ‘कुरिअर’ म्हणून उपयोग करून घेतला जातो. तयारी असल्यास पत्रकेही त्यांच्यासोबत दिली जातात. गावात जाऊन प्रचार करण्याच्या सूचना उमेदवारांकडून दिल्या जातात, असे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सांगतात. उमेदवार मात्र या परिस्थितीवर उघडपणे बोलायला देखील तयार होत नाहीत.
 

तर आयुष्यभर संरक्षण : नागोटी 
अहेरीत वंचितचे उमेदवार अॅड. लालसू नागोटी सांगतात, “मी स्थानिक असल्याने मला फिरण्याचे लाभ अधिक आहेत. माझे सोर्सेस आहेत. नातेवाईकही आहेत. त्यामुळे मी थेट अतिदुर्गम अशा भागातही प्रचाराला जाऊ शकतो. पण १० % भागात मी स्वत: ही फिरू शकणार नाही. इतर उमेदवारांना मात्र प्रचाराला मर्यादा येतात. “पोलिस संरक्षण घेतल्यावर ते आयुष्यभर घ्यावे लागते. त्यामुळे मी ते घेतलेले नाही..”

गडचिरोलीत मोठा फौजफाटा 
> 13,500 जवानांची फौज होणार तैनात 
> 7,500 जिल्हा पोलिस खात्याचे जवान
> 10 कंपन्या राज्य राखीव पोलिस दलाच्या 
> 10 कंपन्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 
> 25 अतिरिक्त कंपन्या दाखल होत आहेत
 

सुरक्षेच्या उपाययोजना अशा आहेत
 

03 हेलिकॉप्टरची मदत : मतदान पथकांची ने-आण  व आकस्मिक परिस्थितीसाठी यंदा गडचिरोलीत तीन हेलिकॉप्टर्स तैनात राहणार.

03 वाजेपर्यंत मतदान : गडचिरोली व आरमोरीचा शहरी भाग वगळता इतर भागात.
> छत्तीसगड, मध्य प्रदेश व तेलंगणासोबत नक्षली हालचालींच्या माहितीचे आदानप्रदान.