आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वांबोरी घाटात कठडे नसल्याने ओढ्यात कोसळली कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वांबोरी घाट गणपती ते वांबोरीपर्यंतच्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच घाट गणपतीजवळील नाल्याला कठडे बसवण्याची तसदीही मागील अनेक वर्षांपासून बांधकाम खात्याने घेतली नाही. या दुर्लक्षामुळे अल्टो चारचाकी गाडी अवघड वळणावरून ओढ्यात कोसळली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत बंग कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहे.

 
वांबोरी ते शेंडी हा जिल्हामार्ग वांबोरी, डोंगरगण, आढाववाडी, पिंपळगाव माळवी, मेहेरबाबा फाटा येथील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेहमीच सार्वजनिक विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. काही दिवसांपूर्वी डोंगरगण ते घाटमाथ्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, संपूर्ण घाटात अजूनही डांबरीकरण झाले नाही.

 

घाटातील कठडेही मोडकळीस आले आहेत. घाट गणपती ते वांबोरी येथील शासकीय विश्रामगृहापर्यंतचा रस्ता अपघातांनाच आमंत्रण देत आहे. हा प्रश्न वारंवार उद््भवत असतानाही हा रस्ता संपूर्ण डांबरीकरण करण्यात आला नाही. नगरहून वांबोरीकडे जाताना घाट उतरल्यानंतर घाटगणपती जवळ मोठा नाला आहे. त्यावर दोन्ही बाजूने असलेले कठडे मोडकळीस आले आहेत. अवघड वळणांच्या असलेल्या रस्त्यावर कठडे दुरुस्तीची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी बंग कुटुंबीय वांबोरीकडून नगरकडे निघाले होते. त्यावेळी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या नाल्याला कठडे नसल्याने अल्टो चारचाकी (एमएच २०, बीसी ४५९९) ही गाडी वळणावरून थेट ओढ्यात कोसळली. त्यावेळी गाडीत बंग कुटुंबातील तीन जण होते. घटना घडताच तेथे नागरिक जमले. या घटनेत गाडीतील तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु, ही घटना घडल्यानंतर जमलेल्या नागरिकांकडून बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तातडीने घाट दुरुस्तीसह वांबोरी रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रस्त्यावर यापूर्वी असे अनेक अपघात घडलेले आहेत.