आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकल घाटात कार पाचशे फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- भरधाव जाताना चालकाचा ताबा सुटल्याने मारुती इकोकार संगमनेरनजीकच्या माहुली गावाजवळील एकल घाटात कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोखंडी कठडे तोडून सुमारे पाचशे फूट खोल दरीत पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले. 


रविवारी सकाळी सातच्या सुमारास नाशिक-पुणे मार्गावर हा अपघात झाला. संजय मधुकर साळवे (४३, रमाबाई नगर, पिंपरी चिंचवड) यांचा अपघातात मृत्यू झाला असून सयाजी बापू वाळुंज (वय ४५, भोसरी, पुणे) व सचिन बाळू मोटे (वय २६, नेहरुनगर, पिंपरी चिंचवड) अशी जखमींची नावे आहेत. 


एम. एच. १४ एफसी १४८७ या मारुती कंपनीच्या इको कारमधून सर्वजण शिर्डीहून पुण्याकडे परतत होते. एकल घाटातील एका तीव्र उतारावर वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट खाली पाचशे फूट खोल असलेल्या दरीत घाटाचे लोखंडी कठडे तोडून कोसळली. अपघातात साळवे यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. 


सकाळीच झालेल्या या घटनेची माहिती जवळच माहुलीत समजताच तेथील नागरिकांनी मदतीसाठी अपघातस्थळी धाव घेतली. घारगाव पोलिसांच्या मदतीने जखमींना वर काढत रुग्णालयात हलवण्यात आले. 


अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक अंबादास भुसारे, नामदेव बिरे आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य उपलब्ध करुन दिले. उशिरापर्यत या संदर्भात घारगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 


महामार्ग पोलिसांची मदत नाही 
नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आळेफाटा, नारायणगाव, खेडजवळील काही भाग वगळता पूर्ण झालेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दिवस-रात्र सुरु असलेल्या या मार्गावरील वाहतुकीसाठी मदतीसाठी डोळासणे येथे महामार्ग पोलिसांचेदेखील कार्यालय आहे. हिवरगाव पावसा येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. मात्र, अपघातानंतर ना महामार्ग पोलिसांची मदत मिळते, ना टोल व्यवस्थापनाची. नागरिकांना मदतीसाठी घारगाव, संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क साधावा लागतो. महामार्गाचे पोलिस अपघातस्थळी मदतीसाठी फिरकत नसल्याने रविवारच्या अपघातातील जखमींना घारगाव पोलिसांनी मदत केली. 

बातम्या आणखी आहेत...