आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अगं अगं म्हशी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण अनेकदा काही गोष्टी गृहीत धरून चालतो. जे किरकोळ आहेत, त्यांना इतके क्षुल्लक समजतो की, प्रसंगी आपण त्यांचा अपमानही करायला किंवा जीवघेण्या संकटात टाकायलाही कमी करत नाहीत. सोलापूरच्या बाहेर पुणे रस्त्याला मी एक प्लॉट घेतला आहे. शहराबाहेर असल्याने प्लॉटवर कुणी अतिक्रमण करू नये यासाठी मी अधूनमधून दुचाकीवर चक्कर टाकून प्लॉट पाहत असतो. हल्ली अतिक्रमणाचे, जागा हडप करण्याचे प्रकार वाढल्याने जरा काळजी घ्यावी लागते. एकदा दुपारी मी शहराबाहेरच्या मोकळ्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी दुचाकीवर एकटाच गेलो होतो. मी तिथे बाजूला गाडी लावली. प्लॉटवर दगड रोवल्याच्या खुणा होत्या. मोकळे रान असल्याने तिथेच 12-15 म्हशी चरत होत्या. त्यांचा गुराखी तेथे नव्हता. मी माझ्या प्लॉटची पाहणी करत असताना अचानक बाजूला चरणा-या दोन - तीन म्हशींचे लक्ष माझ्याकडे गेले.

शहरी माणसाला शेतात पाहिले की म्हशी शिंगाने मारतात, असे मी कुठून तरी ऐकले होते. मी टरकलोच. त्या दोन-तीन म्हशींबरोबरच इतर म्हशीही शेपट्या फुलवून माझ्याकडे रोखून पाहू लागल्या. म्हशींना चरताना मी हजारो वेळा पाहिले असेल; पण तो दिवस म्हशींचा होता. शहरी माणसाला पाहून या म्हशी माझ्या दिशेने शिंगे रोखून येताना पाहून माझ्या घशाला कोरडच पडली. तशाही अवस्थेत मी आरडाओरडा सुरू केला. गाडीकडे पळत सुटलो, किक मारली. ते पाहून म्हशी अधिकच चेकाळल्या व मला घेरण्याचा प्रयत्न करू लागल्या. पाच - सात मिनिटे मी म्हशींच्या गराड्यात अडकून पडलो होतो. हे अनाहूत संकट जीवघेणे वाटत होते. मी आरडाओरड करत होतो. तो एकूण काही वेळाने एक गुराखी कुठून तरी हातात काठी घेऊन पळत आला. माझे संपूर्ण शरीर कापत होते. त्याही परिस्थितीत गुराखी त्याच्या म्हशींचे कौतुक करत होता. ‘साहेब, यापैकी फक्त एकच म्हैस मारकी आहे. बाकीच्या शांत आहेत.’ त्याचे म्हैसपुराण न ऐकताच त्याला आणि त्याच्या म्हशींना कोपरापासून हात जोडत मी तेथून काढता पाय घेतला.