आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरोना आणि पाच ‘पी’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेरीस, जागतिक आरोग्य संघटनेने काेरोनाच्या संसर्गाला ‘साथ’ म्हणून घोषित केले.  ३१ डिसेंबर २०१९ ला चीनमधील वुहान येथे या रोगाच्या संसर्गाची पहिली वार्ता बाहेर आली आणि तीन महिन्यांच्या आत हा विषाणू जगभरातील ११४ देशांमधील १ लाख १८ हजार रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. ‘वेग’ या सध्याच्या मानवासाठी परवलीच्या बनलेल्या शब्दाला नि:शब्द करीत, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, वैद्यकीय संशोधन आणि जागतिक राजकारण या साऱ्यांच्या ‘वेगा’ला लगाम घालत या विषाणूनं साऱ्या जगाला एका पातळीवर आणून ठेवलं आहे. या ९० दिवसांत रुग्णांची संख्या १३ पटीने वाढली आहे, तर लागण झालेल्या देशांची संख्या तिप्पट. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत आकड्यांनुसार आजमितीस यामुळे दगावलेल्यांची संख्या ४ हजार २९१ झाली आहे. काल एकट्या इराणमधील मृतांचा आकडा १९४ वर गेला होता. या साथीचा वेग पाहता आज हे वृत्तपत्र हाती पडेपर्यंत संसर्गित देश, रुग्ण आणि बळी यांचे आकडे निश्चितच यापुढे पोहोचलेले असतील.  जगातील ज्या ११४ देशांमध्ये हा संसर्ग पोहोचला आहे, त्यात भारतही एक आहे. ही आपल्या दृष्टीने सर्वात चिंतेची बाब. भारतातील संसर्गित रुग्णांची संख्या ७३ झाली असली तरी अद्याप एकही बळी जाऊ न दिल्याचे श्रेय निश्चितच देेशातील वैद्यकीय यंत्रणेला द्यावे लागेल. दुसरीकडे दाटीवाटीच्या वस्त्या आणि ओथंबून वाहणाऱ्या रेल्वेगाड्या अशा सर्वाधिक घनतेची लोकसंख्या असलेली मुंबईसारखी शहरे, लोकांनी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठा, मिरवणुका, सोहळे आणि समारंभांचा सोस अशा आपल्या देशात याच्या प्रसाराच्या वेगाची कल्पना पोटात गोळा आणू शकते. अशा वेळी रुग्णांचे आकडे मोजण्यापलीकडे आणि निराधार मेसेजेस फॉरवर्ड करून अफवांमध्ये तेल ओतण्याशिवाय प्रत्येकाने जबाबदारीने वागल्यास ही साथ आटोक्यात येऊ शकते. या साथीशी मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी पाच ‘पी’चा मंत्र दिला आहे - प्रिव्हेन्शन, प्रिपेअर्डनेस, पब्लिक हेल्थ, पॉलिटिकल लीडरशिप आणि पीपल. तपकिरीने प्रतिबंध लागू शकतो अशी बेजबाबदार विधाने करणारे लोकनेते आणि मूर्तीला मास्क बांधणारे भक्त असलेल्या आपल्या देशात या पाचही ‘पी’ बाबत बोलण्याची सोय नाही. ही साथ आटोक्यात आणण्यात आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यात या देशातील या पाचही ‘पी’ ची कसोटी लागणार आहे. आजची लढाई विषाणूविरोधात आहे आणि उद्याची घसरलेल्या अर्थकारणाची. जगातील ९० टक्के रुग्णांची संख्या असलेल्या चीन आणि कोरियाने या साथीवर ताबा मिळवला आहे. ८१ देशांनी यास त्यांच्या सीमेबाहेरच रोखले आहे. ५७ देशांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण आहेत. भारतानं मात्र ही धोक्याची सीमा ओलांडली आहे. सध्या देशात ७३ जणांना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. आता आव्हान आहे, ते मृत्यू रोखण्याचे आणि साथ आटोक्यात आणण्याचे!