Maharashtra Special / तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख असलेला व्हिडिओ TikTok वर केला अपलोज, 5 जणांविरुद्ध मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा


तबरेजला गाडी चोरी केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी मरेपर्यंत मारहाण केली होती

दिव्य मराठी

Jul 09,2019 09:53:00 AM IST

मुंबई- टिक टॉक अॅपवर मॉब लिचींगमध्ये मृत पावलेल्या तबरेजबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत व्हिडिओ अपलोड केला. व्हिडीओ अपलोड होताच काही वेळातच व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांमध्ये फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधन फारुकी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या तरुणांचा शोध घेत आहे.


या तरुणांनी टिक टॉकवर तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत म्हटले, ''जर तबरेजच्या मुलाने उद्या बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो असे म्हणून नका.'' व्हिडीओलाही कमी वेळात प्रसिद्धी मिळाली आणि तो व्हायरल झाला. व्हिडीओ "टीम 07" या नावाखाली बनवून अपलोड केला होता. व्हिडीओ शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या एलटी मार्ग पोलिस स्टेशनला याची तक्रार केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या पाच जणांविरोधात कलम 153(A) च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर टिक टॉककडून त्यांचे अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे दोन समाजात वाद होण्याची शक्यता होती, त्यामुळे तातडीने हा व्हिडीओ टिक टॉकवरुन हटवण्यात आलाय. पोलिसांनी या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


कोण आहे तबरेज अन्सारी?
तबरेज अन्सारी मॉब लिचींगमध्ये मृत पावला होता. त्याच्यावर बाईक चोरीचा आरोप करत गावातील लोकांनी बेदम मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्याच्या घातकीडी येथे घडली होती. तबरेजकडून गावकऱ्यांनी "जय श्री राम" आणि "जय हनुमान" या घोषणाही बोलून घेतल्या होत्या आणि तो मुसलमान असल्याने त्याला मारहाण केली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहे.

X