Home | Business | Business Special | case filed against Rajkumar Hirani tiger shroff and dinesh vijan

राजकुमार हिराणी ४५ कोटींच्या अघोषित संपत्तीचे आरोपी; टायगर श्रॉफसह एक निर्माताही आरोपांच्या कचाट्यात

कुमुद दास | Update - Apr 17, 2019, 11:02 AM IST

प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सिनेस्टाइल पकडली हिराणींची संपत्ती, फेकलेल्या कागदातून सुगावा

 • case filed against Rajkumar Hirani tiger shroff and dinesh vijan

  मुंबई- कार्यालयाच्या एका कोपऱ्यात कचऱ्याप्रमाणे फेकलेला ४५ कोटी रुपयांचा करार चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या अघोषित संपत्तीचा पुरावा बनला आहे. मुंबईच्या प्राप्तिकर विभागाने बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि स्त्री चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांनाही अघोषित संपत्ती ठेवल्याप्रकरणी आरोपी ठरवले आहे. त्यांनी मार्चमध्ये फाइल केलेल्या आयटीआरमध्ये या संपत्तीचा उल्लेख केलेला नाही. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणाचा तपास अहवाल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) पाठवला आहे. सीबीडीटी प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ कार्यालय आहे. सीबीडीटीकडून आदेश आल्यानंतर प्राप्तिकर विभाग या तिघांना नोटिसा पाठवून चौकशी करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. ही नोटीस मिळाल्यानंतरच या तिघांना स्वत:च्या बाजूने प्राप्तिकर लवादामध्ये अपील करण्याचा पर्याय असेल.

  मुन्नाभाई एमबीबीएस, संजू आणि पीके यांसारखे सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या हिराणी यांच्याकडील अघोषित संपत्ती मिळण्याची कथाही तशी सिनेस्टाइलच आहे. सर्व्हे करण्यासाठी प्राप्तिकर अधिकारी हिराणी यांच्या कार्यालयामध्ये गेले होते. त्या वेळी त्यांना कोपऱ्यामध्ये फेकलेला कागद दिसतो. तो कागद ते गुपचूप उचलून खिशात ठेवून देतात. हा कशाचा कागद आहे, हे त्या वेळी त्यांनाही माहिती नसते. तो पाहिल्यानंतर हा नेटफ्लिक्स आणि हिराणी यांच्यादरम्यान संजू चित्रपटाच्या कॉपी राइट्ससंदर्भातील ४५ कोटी रुपयांचा करार असल्याचे लक्षात येते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हिराणी यांच्या वतीने भरण्यात आलेल्या आगाऊ कर आणि अंतिम आयटीआरचा तपास केला, त्यात या कराराचा उल्लेखच करण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आले.

  सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या तपासाचा अहवाल मुंबई प्राप्तिकर विभागाने मागील आठवड्यातच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) पाठवला आहे. सीबीडीटी प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ कार्यालय आहे. विभागाचे मुख्य आयुक्त ए. अभय शंकर यांनी सांगितले की, “६ महिन्यांमध्ये आम्ही मुंबईमध्ये ६५० पेक्षा जास्त सर्व्हे आणि तपास केले आहेत. यामध्ये बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांच्या कार्यालयाचा आणि घरांचा समावेश आहे. अनेकांनी संपत्ती लपवली असल्याचे समोर आले आहे. एकूण १,५०० कोटी रुपयांची अघोषित संपत्तीची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये सर्वच श्रेणींतील लोकांचा समावेश आहे.’

  राजकुमार हिराणी: ४५ कोटींचा करार नेटफ्लिक्ससोबत
  संजू चित्रपटासाठी हिराणी आणि नेटफ्लिक्स यांच्यादरम्यान ४५ कोटी रुपयांचा करार झाला होता. नेटफ्लिक्स या चित्रपटाचा एक्झिबिशन पार्टनरदेखील आहे. हिराणी यांनी त्यांच्या आगाऊ स्वरूपात भरलेल्या करामध्ये तसेच मार्चमध्ये भरलेल्या अंतिम करातही या रकमेचा उल्लेख केलेला नाही.

  टायगर श्रॉफ : ‘बागी’साठी मिळालेले १० कोटी लपवले
  अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या अघोषित संपत्तीत बागी चित्रपटाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटासाठी त्यांना १० कोटी रुपये मिळाले होते. या पैशांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या आयटीआरमध्ये केलेला नाही. सध्या टायगर ‘स्टुडंट ऑफ द इयर- २’च्या तयारीमध्ये व्यग्र आहेत.

  दिनेश विजन : स्त्री चित्रपटाच्या २४ कोटींची माहिती लपवली
  दिनेश विजन यांनी स्त्री चित्रपटाशी संबंधित मिळालेल्या २४ कोटींची माहिती लपवली असल्याचा आरोप आहे. निर्माता कंपनी चेक वटवण्यासाठी गेल्यावर प्राप्तिकर विभागाला याची माहिती मिळाली. विजयन यांनी बॉलीवूडच्या स्त्री आणि बदलापूरसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Trending