आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच प्रकरण : सीबीआयचा अापल्याच ऑफिसवर छापा, अस्थाना यांच्या चमूतील डीएसपी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीअाय विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याशी संबंधित सव्वातीन कोटींच्या लाचखोरी प्रकरणात आरोपी डीएसपी देवेंद्रकुमार यांना सोमवारी सीबीआयने अटक केली. देवेंद्र हे आधी अस्थानांच्या नेतृत्वातील एसआयटीमध्ये डीएसपी होते. त्यांच्याकडेच मांस व्यावसायिक मोईन कुरेशीच्या प्रकरणाचा तपासही होता. आरोपांनुसार, सीबीआयचे संचालक आलोक वर्मांना अडकवण्यासाठी देवेंद्रकुमार यांनी हैदराबादचा एक व्यापारी सतीश बाबू सनाचा बनावट जबाब नोंदवला होता. सीबीआयचे एक पथक रात्री उशिरापर्यंत अापल्या मुख्यालयातीलच देवेंद्रकुमार यांच्या कार्यालयात तपास करत होते. सूत्रांनी सांगितले की, अटकेपासून वाचण्यासाठी अस्थाना यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र अस्थानांकडून याबाबत वक्तव्य करण्यात आलेले नाही. सीबीआयने १५ ऑक्टोबरला अस्थाना, देवेंद्र आणि इतरांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल केला होता. सनाकडून वर्मांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप अस्थानांनी २४ आॅगस्टला सीव्हीसीला लिहिलेल्या पत्रात केला होता. यानंतर दोन्ही उच्चाधिकाऱ्यांतील संघर्ष सार्वजनिकरीत्या समोर आला होता. 


राहुल यांचे टीकास्र : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधानांच्या आवडीच्या गुजरात केडरचे अधिकारी, गोधरा एसआयटीत चर्चित, सीबीआयमध्ये बळानेच दुसऱ्या स्तरावरील पद बळकावणारे आता लाच प्रकरणात अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तपास संस्था राजकीय सूड उगवण्याचे हत्यार बनली आहे. दुसरीकडे, या संपूर्ण वादावर भाजपने मौनच बाळगले आहे. 


अस्थानांच्या नेतृत्वातील एसआयटीमधील इतर अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासली जात आहे 
सूत्रांनुसार, सीबीअायचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांंच्या नेतृत्वातील एसआयटीमधील इतर अधिकाऱ्यांच्या भूिमकांचीही चौकशी केली जात आहे. हा सर्व वाद सीबीआयचे दोन उच्चाधिकारी म्हणजेच संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या संघर्षातील प्रकरणातील एक दुवा म्हणून समोर आला आहे. देशातील प्रतिष्ठित तपास यंत्रणेतील या वादाची पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. सूत्रांनुसार, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना पाचारणही केले होते. 


आरोप : जबाब नोंदवले दिल्लीत, मात्र सना हा हैदराबादमध्येच होता 
राकेश अस्थानांची टीम हैदराबादचा व्यावसायिक सतीश बाबू सनाचा मोईन कुरेशीसोबत ५० लाख रुपयांच्या व्यवहारांची चौकशी करत होती. देवेंद्रकुमारांनी सनाचा बनावट जबाब नाेंदवल्याचा आरोप आहे. त्यात सनाने लाच दिल्याची कबुली दिली होती. तसेच म्हटले हाेते की, आपण जूनमध्ये टीडीपीचे राज्यसभा सदस्य सी.एम. रमेश यांच्या माध्यमातून सीबीआय संचालकांशी बोललो होते. आता पुढे बोलावले जाणार नाही, असा भरवसा रमेश यांनी दिला होता. हा जबाब २६ सप्टेंबरला २०१८ ला दिल्लीमध्ये नोंदवला होता. मात्र सीबीआय चौकशीत कळले की, त्या दिवशी सना हैदराबादेतच नव्हता. 

बातम्या आणखी आहेत...