आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅशबॅक : एक वर्षात 10 हजार कोटींचे वाटप, 7 वर्षे मिळेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डिजिटल पेमेंट, विशेषत: यूपीआयद्वारे (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) पेमेंट देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने यंदा बजेटमध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. ‘दिव्य मराठी’ने डिजिटल पेमेंट ट्रेंडची पडताळणी केली असता कॅशबॅक आॅफर्सनीही त्याला खूप प्रोत्साहन मिळत असल्याचे समोर आले. पेमेंट्स कौन्सिल आॅफ इंडियाचे मानद सदस्य आणि फिनटेक काॅन्व्हर्जन्स कौन्सिलचे अध्यक्ष नवीन सूर्या यांनी सांगितले की, विविध कंपन्यांचे आकडे आणि अंदाजानुसार, गेल्या आर्थिक वर्षातच ८ ते १० हजार कोटी रुपये कॅशबॅकद्वारे देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, यूपीआय प्लॅटफाॅर्मवर आधारित अॅप्सवर ट्रान्झॅक्शन वेगाने वाढले आहेत. नॅशनल पेमेंट्स आॅफ काॅर्पोरेशन आॅफ इंडियानुसार (एनपीसीआय) २०१८-१९ मध्ये एकूण ५३५ कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन झाले, त्यांचे एकूण मूल्य ८.७७ लाख कोटी रुपये आहे. ते गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ८ पट जास्त आहे. 


सर्वात जास्त कॅशबॅक यूपीआय आधारित अॅप्सच (गुगल पे, फोन पे आणि पेटीएम) देत आहेत. दुसरीकडे, गुगल आणि बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (बीसीजी) ‘डिजिटल पेमेंट्स २०२०’ या अहवालानुसार भारतात लहान शहरांत ५७% लोक आॅफर्समुळेच डिजिटल पेमेंटचा वापर करतात. महानगरांमध्येही हा आकडा ४८ टक्के आहे. नवीन यांच्या मते, बहुतांश पेमेंट अॅप्स तोट्यात आहेत. तरीही ते कॅशबॅक देत आहेत, कारण त्यांना ग्राहकांची संख्या आणि ब्रँड व्हॅल्यू वाढवायची आहे. त्यामुळे हा प्रकार ५ ते ७ वर्षे सुरूच राहणार आहे. त्यांच्या मते, कॅशबॅक ही भारतात नवीन ग्राहक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे.


तीन केसमधून समजून घेऊ कॅशबॅकचे गणित
केस 1

भोपाळमध्ये राहणाऱ्या सात्त्विक श्रीवास्तवने एका फूड अॅपद्वारे बटर पनीरची ऑर्डर दिली. त्याची किंमत १०० रुपये होती. फूड अॅपवर ६०% डिस्काउंट मिळाला आणि उर्वरित रक्कम अॅमेझॉन पेद्वारे दिली. त्यावर ३० रुपये कॅशबॅक मिळाला. म्हणजे सात्त्विकला बटर पनीर १० रुपयांत मिळाले.


केस 2
सुरतच्या वैभव पटेलने आपल्या मित्राला गुगल पे डाउनलोड करण्याची लिंक शेअर केली. मित्राने अॅप डाउनलोड करून वैभ‌वलाच १५०० रुपये ट्रान्सफर केले. वैभवला अॅप रेफर करण्यासाठी ५० रुपये कॅशबॅक मिळाले आणि त्याच्या मित्राला पहिल्या ट्रान्झॅक्शनसाठी ८० रुपये कॅशबॅक मिळाले. 


केस 3
दिल्लीत एका रेस्तराँ मालकाला आरवने विचारले की, मी येथे बसून फूड अॅपने ऑर्डर देऊ का? मालकाने आक्षेप घेतला नाही. आरवने फूड अॅपद्वारे ऑर्डर दिली. त्याला ३०% डिस्काउंट आणि फोने पे पेमेंटवर १५ रु. कॅशबॅक मिळाले. आरवने थेट रेस्तराँत ऑर्डर केली असती तर ५० रु. जास्त द्यावे लागले असते.


३ प्रकारचे कॅशबॅक, ते कसे मिळतात
थेट खात्यात

गुगल पे, फोन पेसारखे अॅप्स डिजिटल पेमेंट किंवा ट्रान्सफरवर थेट बँक खात्यात पैसे देतात. ते असे यामुळे करतात, कारण त्यांना आपल्याजवळ पैसा होल्ड करण्यासाठी आरबीआयकडून परवानगी घ्यावी लागेल. बहुतांश कॅशबॅक बँक खात्यात ट्रान्सफर किंवा ऑनलाइन शॉपिंगवरच मिळत आहे.

फक्त अॅपमध्ये
अनेक ट्रॅव्हल, फूड, रिटेल अॅप्स स्वत:च्या वॉलेटमध्येच कॅशबॅक देतात, जे फक्त त्यांच्या अॅपवरच वापरू शकता. कॅशबॅक बँकेत जात नाही आणि लाभ घेण्यासाठी अॅपवरच पुन्हा खरेदी करावी लागते. म्हणजे डिस्काउंट तर मिळतो, पण पुढील खरेदीवर. अनेक अॅप्समध्ये अशा कॅशबॅकची एक्स्पायरी डेटही असते.


क्रेडिट कार्डमध्ये 
अनेक क्रेडिट कार्ड कंपन्याही ठरलेल्या वेबसाइट्स किंवा अॅपद्वारे खरेदी केल्यावर कॅशबॅक देतात. हा पैसा नंतर क्रेडिट कार्ड बिलातून वजा होतो. एका मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यावरच ऑफर आणि निश्चित मर्यादेपर्यंतच कॅशबॅक मिळते.


आणखी ग्लोबल कंपन्या येणार, त्यामुळे आणखी काही वर्षे कॅशबॅक मिळत राहील
देशात वाढते डिजिटल पेमेंट मार्केट आता आणखी नव्या खेळाडूंना मैदानात उतरवेल, त्यामुळे त्यांच्यात ऑफर्स आणि कॅशबॅक देण्याची स्पर्धा राहील. नवीन सूर्या यांनी सांगितले की, आगामी काळात आणखी ग्लोबल कंपन्या भारतीय मार्केटमध्ये उतरतील. व्हॉट्सअॅप लवकरच आपली पेमेंट सर्व्हिस सुरू करत आहे, तिची चाचणी सुरू आहे. ट्रूकॉलर अॅपने ही सर्व्हिस आधीच सुरू केली आहे. चीनची टेेेन्सेंट कंपनी ‘व्हीचॅट पे’ सेवा भारतात सुरू करू शकते. या सर्वांना बाजारात प्रस्थापित होण्यासाठी ऑफर्स द्याव्या लागतील आणि कॅशबॅक ऑफर सर्वाधिक यशस्वी ठरली आहे.