महाराष्ट्रामध्ये शरद पवारांमुळेच विखारी जातीयवाद, राहुलकडून देखावा : तावडे

विशेष प्रतिनिधी|

Apr 19,2019 08:39:00 AM IST

मुंबई - ज्या वेळी छत्रपती संभाजीराजे यांना नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले त्या वेळी पवार म्हणाले होते की, जुन्या काळात छत्रपती फडणवीस नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना नेमत आहेत. त्यामुळे इतका विखारी जातीयवाद हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच पाहायला मिळाला, असा अाराेप शिक्षणमंत्री अाणि भारतीय जनता पक्षाचे नेते विनाेद तावडे यांनी केला.
शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. त्यांनी मुख्यमंत्रिपद-मंत्रिपदे स्वत: भूषवली, कुटुंबातील इतरांनाही पदे मिळवून दिली. पण त्या जातीसाठी शरद पवारांनी काहीच केले नाही. जे केले ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले, हे पवारांनी लक्षात ठेवावे. शरद पवार बहुधा हे विसरले आहेत की, अाजकालच्या तरुणांना हे अजिबात आवडत नाही. विकासावर, प्रगतीवरच राजकारण केले पाहिजे, असा हा पुरोगामी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मानतो, असेही ते म्हणाले.


दरम्यान, विनोद तावडे यांनी या वेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधींनी काल केरळमध्ये हिंदू परंपरेने पूजा केली. हा गांधी परिवारात मोठा चांगला बदल झाला आहे. एका बाजूला धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना लांब ठेवायचे आणि विशिष्ट धर्माला जवळ करायचे, असे मानणारा गांधी परिवार आता विविध धर्मांच्या प्रथेप्रमाणे, पूजेप्रमाणे आपले भाग्य आजमावयला लागल्याचे चित्र पहिल्यांदा दिसले. पण आता हे मनापासून आहे की, केवळ निवडणुकांपुरते हे येत्या काळातच कळेल, अशी टीकाही विनोद तावडेंनी केली.

अमेठीसह वायनाडमध्येही राहुल गांधी हरतील : गाेयल
पुणे - पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठीसोबत वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. मात्र, वायनाडमध्येही त्यांचा पराभव होईल, अशी टीका रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी केली. भाजपकडून आयाेजित व्यापाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. गोयल म्हणाले, पुढील निवडणुकीत राहुल गांधींना अन्य देशात जावे लागल. “चौकीदर चोर है’ या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना आधीच नोटीस बजावली असून निवडणूक आयोगानेही त्याची दखल घेतली आहे. मात्र, काँग्रेस व राहुल गांधी ७० वर्षे खोटा प्रचार करत आहेत.

मुकेश अंबानींचा पाठिंबा, तरीही काँग्रेस हरणार
मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे मुंबईतील उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला अाहे. त्यावर गाेयल म्हणाले, देशातील करोडपती सावकार काँग्रेसला पाठिंबा देत असले तरी देशातील १३० कोटी जनता भाजपसाेबत आहे. निवडणुकीनंतर भाजपच पुन्हा सत्तेवर येईल.

X
COMMENT