आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांजराने वाचवले प्राण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटना छोटी, पण या घटनेमुळे आमच्या कुटुंबाचे प्राण वाचले असल्याने ते मला महत्त्वाचे वाटते. आम्ही आता सोलापुरात असलो तरी काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात राहत होतो. तेथे शेती हा मुख्य व्यवसाय.स्वयंपाक चुलीवर. चुलीला इंधन म्हणून गोव-या वापरायचो. त्या वेळी आम्ही घरात मांजर पाळले होते. त्या मांजराला आमचा इतका लळा लागला होता की, ते मांजर आमच्या घरातील जणू एक सदस्यच बनले होते.

एकदा नेहमीप्रमाणे माझ्या आईने रात्री चुलीवर स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यानंतर चुलीतील जळते निखारे पाणी टाकून तिने विझविले. नंतर आम्ही सगळे जेवण करून झोपी गेलो. सकाळी चहा करण्यासाठी आई चुलीजवळ गेली. त्या वेळी लहान असलेला मी आईच्या मागेच उभा होतो. चूल पेटवण्याअगोदर चुलीतील राख बाहेर काढतात.

नेहमीप्रमाणे आईने चुलीतील आदल्या दिवशीची राख काढण्यासाठी चुलीत हात घालताच तेथेच शेजारी घुटमळणा-या आमच्या घरातील पाळीव मांजराने आईच्या हाताला झटका देऊन चुलीत उडी घेतली. क्षणभर काय झाले ते आम्हाला समजलेच नाही. मांजराने त्या चुलीतून काहीतरी ओढून बाहेर काढले. बघतो तर काय? तो साप होता. मांजराच्या तोंडात साप बघून आम्ही हादरलोच. मांजराच्या प्रसंगावधानाने आमचे प्राण वाचले होते. घराभोवती गवताळ भाग असल्याने रात्रीच्या वेळी कुठून तरी साप चुलीत शिरला असावा. या परिसरात असे साप, विंचू निघतात हे ऐकून होते. पण प्रत्यक्ष वेळ आल्याशिवाय कळत नाही. पाळीव कुत्र्या-मांजराने त्यांच्या मालकाचे जीव वाचवल्याच्या अनेक घटना आहेत. लहानपणी पाहिलेल्या घटना आयुष्यभर मनावर ठसतात, असे म्हणतात. आमच्या घरातील मांजराने आमचे प्राण वाचवले. खाल्ल्या मिठाला व पिलेल्या दुधाला ते जागले, हे आजही आवर्जून सांंगावेसे वाटते. घरादारांच्या रक्षणासाठीच कुत्रे-मांजर प्राणी पाळण्याची प्रथा आहे. पाळीव प्राणी अत्यंत इमानदार असतात हेच या अनुभवातून सिद्ध होते.