आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टानुसार सीबीआय संचालकांनी पद स्वीकारले, पण... 54 तासांतच वर्मांची पुन्हा हकालपट्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वादग्रस्त सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारप्राप्त सलेक्ट कमिटीने हकालपट्टी केली. भ्रष्टाचार व अनियमिततेच्या आरोपांवरून सक्तीच्या सुटीवर पाठवल्यानंतर वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा पद बहाल करण्याचे आदेश दिले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय सलेक्ट कमिटीने घ्यावा, असे म्हटले हाेते. यानंतर वर्मा यांनी पुन्हा पद स्वीकारले खरे; परंतु ५४ तासांतच त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्यावर असलेल्या १० आरोपांपैकी ४ मध्ये तथ्य आढळले. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या २१ दिवस आधी हटवण्यात आलेले वर्मा सीबीआयच्या ५५ वर्षांच्या इतिहासातील पहिले संचालक आहेत. 

 

पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी सलेक्ट कमिटीच्या गुरुवारी अडीच तास चाललेल्या बैठकीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नियुक्त केलेले सदस्य न्या. ए. के. सिकरी आणि दुसरे सदस्य काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे उपस्थित होते. यात मोदी-सिकरी यांनी विरोधात मत मांडले. तर, खारगे यांनी वर्मा यांना हटवण्यास विरोध केला. सलेक्ट कमिटीने २:१ अशा बहुमताने वर्मा यांना हटवण्याचा निर्णय घेतला. वर्मा ३१ जानेवारीला निवृत्त होत असून तोवर ते अग्निशामक विभागाचे महासंचालक राहतील. 

 

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे वर्मांच्या बाजूने, आरोपांवर पुढील तपास करण्याची गरज केली व्यक्त; ७७ दिवसांची मुदतवाढ मागितली 
सिलेक्शन कमिटीच्या बैठकीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वर्मांना पदावरून हटवण्यास विरोध दर्शवला. वर्मांना शिक्षा दिली जाऊ नये. त्यांना इतके दिवस कार्यालयात येऊन काम करू दिले नाही. त्यामुळे त्यांना ७७ दिवसांची मुदतवाढ द्यायला हवी. खरगे यांनी दुसऱ्यांदा वर्मा यांना हटवण्यास विरोध केला आहे. वर्मा यांच्याविरोधात आरोप असल्याचे न्यायमूर्ती सिकरी यांनी बैठकीत म्हटले. दरम्यान, वर्मा यांना त्यांची बाजू मांडू दिली गेली नाही. यावरून पंतप्रधान सीबीआयचे स्वतंत्र संचालक आणि जेपीसीच्या तपासाला घाबरल्याचे सिद्ध झाल्याचे काँग्रेसने म्हटले. या निर्णयानंतर एम. नागेश्वर राव पुन्हा एकदा सीबीआयचे अंतरिम संचालक म्हणून काम सांभाळणार आहेत. 
 
'रॉ'ने इंटरसेप्ट केले वर्मांचे संभाषण, त्यातच पैसे घेतल्याचा मुद्दा उजेडात 
सीव्हीसीच्या अहवालात गुप्तचर संस्था 'रॉ'च्या इंटरसेप्ट्समध्ये सीबीआयप्रमुखांना पैसे मिळाल्याचा उल्लेख आहे. तसेच त्यात म्हटले आहे की, सीबीआय हैदराबादचा व्यावसायिक सतीश बाबू सनाला आरोपी करू पाहत होती. मात्र वर्मा यांनी हिरवा कंदील दिला नाही. सनाच्या तक्रारीवरूनच विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही अधिकाऱ्यांत वाद होता. तो चव्हाट्यावरही आला होता. 

 

याआधारे कारवाई: सीव्हीसीने सुप्रीम कोर्टाला दिला होता हा तपास अहवाल  
1. लाच घेऊन तपास प्रभावित करणे 
निष्कर्ष : कोणताही पुरावा नाही. 
2. (अ) आयआरसीटीसी एफआयआरमध्ये एका संशयिताचे नाव येऊ दिले नाही. 
निष्कर्ष : आराेप सिद्ध. कारवाई गरजेची 
2. (ब) पाटण्यात झडती रोखण्याचा प्रयत्न 
आराेप सिद्ध झाला नाही. 
3. बँक घोटाळ्यात आरोपीविरुद्ध तपास अहवाल पूर्ण करण्यात उशीर. आरोपीला वाचवले जात असल्याचे स्पष्ट दिसते. 
आरोप सिद्ध झाला. 
4. सीबीआय सहसंचालकांबाबतच्या प्रकरणात अनियमितता बाळगली. 
आरोपांना दुजाेरा मिळाला नाही. 
5. गंभीर प्रकरणांत गुप्त माहिती मिळूनही कारवाई केली नाही. 
आरोपांना दुजोरा मिळाला नाही. 
6. गुरगावात भूसंपादनाच्या प्राथमिक तपासात ३६ कोटींची लाच घेतली. 
आरोपांची खात्री, पण पुढे तपासाची गरज. 
7. इंदिरा गांधी विमानतळावर साेन्याच्या तस्करीवर कारवाईत निष्फळ. 
अंशत: खात्री. प्रकरणात सीबीआयच्या दुसऱ्या टीमकडून तपास आवश्यक. 
8. पशू तस्कर आणि एका बीएसएफ अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. 
आरोप सिद्ध झाला नाही. 
9. कलंकित अधिकाऱ्यांना सीबीआयमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. 
आरोप सिद्ध झाला. 
10. ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयच्या प्रकरणांत अनावश्यक हस्तक्षेप केला. 
आरोप सिद्ध झाले नाही किंवा त्यात पुढे तपासाची गरज आहे. 

 

दोन अधिकाऱ्यांचे भांडण; ते सक्तीच्या रजेवर पाठवण्यापर्यंतच्या घडामोडी 
१५ ऑक्टोबर २०१८ - विशेष संचालक राकेश अस्थानांवर भ्रष्टाचाराचा खटला २३ ऑक्टोबर - रात्री २ वाजता वर्मा-अस्थाना यांना सुटीवर पाठवले. अधिकारी बदलले २४ ऑक्टोबर - वर्मा सुप्रीम कोर्टात गेले. सीबीआयला सरकारी नियंत्रणापासून वाचवण्याचे आवाहन केले ८ जानेवारी २०१८ - आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. 

 

बातम्या आणखी आहेत...