Education / सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांचेही अकरावीचे प्रवेश लेखीच्या गुणांवरच

निकाल घसरल्याने आदित्य ठाकरेंकडून तावडेंना घरचा आहेर

विशेष प्रतिनिधी

Jun 12,2019 09:52:00 AM IST

मुंबई - राज्य शिक्षण मंडळाअंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने राज्यात यंदा निकालही घसरला आहे. आता या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने सीबीएसई व आयसीएसईच्या दहावी पास या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश द्यावा, अंतर्गत गुण गृहीत धरू नयेत, यासाठी राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे आग्रह धरणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.


कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालक यांनी मंगळवारी राज्याचे शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांची भेट घेतली. चर्चेमध्ये त्यांनी आयसीएससी व सीबीएससी विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री तावडे म्हणाले की, राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आलेले नसल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळी सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहीत न धरता केवळ लेखी परीक्षेचे गुण गृहीत धरावेत आणि त्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश देण्यात यावे, अशी चर्चा बैठकीत झाली.


मुख्याध्यापक आणि पालक यांनी दिलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. दोन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचे गुण अकरावी प्रवेशासाठी गृहीत धरल्यास विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणता येईल, असा विचार मुख्याध्यापक आणि पालकांनी आज झालेल्या बैठकीत मांडले, असे तावडे यांनी सांगितले. या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सुमारे १५ शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच पालक उपस्थित होते.


विद्यार्थ्यांवर अन्याय हाेणार नाही
गेल्या काही वर्षांची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी पाहता आयबी, आयजीसीएसई बोर्डाच्या केवळ ७ ते ९ इतक्या कमी संख्येने विद्यार्थी ११ वीला प्रवेश घेतात. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे सुमारे साडेचार टक्के विद्यार्थीच प्रवेश घेतात. यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झालेले आहे. त्याआधारे पुढे जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवला पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे, असे तावडे यांनी सांगितले. दरम्यान, तावडे यांनी आश्वासन दिले असले तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवेश सुरू होतानाच खरी परिस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.


प्रवेशात डावलले जाण्याची विद्यार्थी- पालकांत भीती अनाठायी
यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य मिळेल, ही अनाठायी भीती राज्य मंडळाचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत मुख्याध्यापक आणि पालकांनी काही सूचना केल्या, त्याचा विचार येईल, असे शिक्षण मंत्री विनाेद तावडे म्हणाले.


निकाल घसरल्याने आदित्य ठाकरेंकडून तावडेंना घरचा आहेर
मुंबई -
अंतर्गत गुण देण्याची पद्धत बंद केल्याने बृहन्मुंबई महापालिका शाळांचा यंदा दहावीचा निकाल चांगलाच घसरला असून त्याबद्दल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. सध्याची गुण देण्याची पद्धत बदलायला हवी, अशी सूचना करत आपल्याच सरकारचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घरचा आहेर दिला. मुंबई महानगरपालिकेत शिक्षण आणि आरोग्य विभागाचा आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी आढावा घेतला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘मनपा शाळांचा निकाल उत्तम लागावा म्हणून आणखी काही बदल केले जातील. या वर्षापासून पालिकेच्या शिक्षणाबाबत नॅबिट या संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल.’


निवडणुका दूर, दुष्काळास प्राधान्य : विधानसभा लढवणार का, या प्रश्नावर आदित्य म्हणाले, ‘निवडणुका दूर आहेत. राज्यात दुष्काळाचा प्रश्न मोठा आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे सध्या दुष्काळ व पावसाळा हे दोनच विषय महत्त्वाचे आहेत. त्याच विषयावर काम करण्यास मला आवडेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

X
COMMENT