आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक जिल्ह्यात ‘सीसीटीव्ही सर्व्हिलन्स’ - पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  - सीसीटीव्ही सर्व्हिलन्स हे राज्यातील पोलिस दलासाठी फोर्स मल्टिप्लायर ठरत असून प्रत्येक जिल्ह्यात सीसीटीव्ही प्रकल्पासह कमांड आणि कंट्रोल रूमची व्यवस्था असावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे देणार असल्याची माहिती राज्याचे नवे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी नागपुरात मंगळवारी दिली.   


सध्या मुंबईसह निवडकच शहरांतच सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्यवस्था कार्यरत आहे. मुंबईत अनेक संवेदनशील गुन्हे उघडकीस होण्यास या यंत्रणेची मदत होत आहे. एक प्रकारे ही व्यवस्था राज्य पोलिस दलासाठी फोर्स मल्टिप्लायर ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ही व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, असे पोलिस महासंचालकांनी या वेळी सांगितले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलिस महासंचालक जयस्वाल नागपुरात होते. नक्षलग्रस्त गडचिरोलीत निवडणुक शांतता आणि सुरक्षेत पार पाडण्यासाठी पोलिस दलाने विशेष व्यवस्था करण्यात आली असून कुठलीही परिस्थिती कशी हाताळायची याबाबतच्या सूचना तेथील दलांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांत नक्षलग्रस्त असेल्या गडचिरोली जिल्हा आणि परिसरात  मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या कारवायांत वाढ झाली आहे. तसेच नक्षल्यांनी अनेक निरापराध नागरिकांना ठार करण्याचे  देखील  स्वीकारल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण बघायला मिळत आहे.


१५ मार्च रोजी मध्य प्रदेश पोलिसांशी बैठक
पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या दृष्टीने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १५ मार्च रोजी मध्यप्रदेश पोलिस दलासोबत बैठक असून निवडणुकीदरम्यान गुन्हे रोखण्यासाठी दोन राज्यांमध्ये कशा पद्धतीने समन्वय राखायचा,यावरील उपायांवर चर्चा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस महासंचालक गडचिरोलीत जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...